Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : या बसा अन् बोला...; दिंडोरीसाठी महाआघाडीचे 'मनोमिलन'

Arvind Jadhav

Nashik Political News: महाआघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात लढले. आता मात्र, परिस्थिती बदलली असून, या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन व्हावे आणि उमेदवारांची चाचपणी व्हावी, यासाठी महाआघाडीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपनेसुद्धा असा प्रयत्न यापूर्वी केला. मात्र, त्यात पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनापेक्षा एकमेकांची उणीधुणी काढण्यातच वेळ वाया गेला होता.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर प्रथमच लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीला हे पक्ष सामोरे जात आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होणार अशी शक्यता आहे. मात्र, अद्याप कार्यकर्त्यांना कोणता पक्ष कोणत्या जागेवरून लढणार आणि आपला उमेदवार कोण हेच माहिती नाही. ही संदिग्धता आणखी काही दिवस कायम राहू शकते. या पार्श्वभूमीवर महाआघाडीने प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष आपले निर्णय लवकरच जाहीर करतील. मात्र, वरिष्ठ पातळीवरून येणारा निर्णय महाआघाडीतील घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांना पुढे न्यावा लागणार आहे. महाआघाडीतील कोणता पक्ष लढेल, कोण उमेदवार असेल हा प्रश्न तेव्हा महत्त्वाचा राहणार नाही. त्यामुळे या बैठकांचे महत्त्व वाढले आहे. 26 तारखेपासून बैठकांचे सत्र सुरू होईल.

या बैठका फक्त दिंडोरी लोकसभा मतदारसंघापुरत्या मर्यादित आहेत. एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तीन बैठकांचे आयोजन होणार असून, तीन दिवसांत दिंडोरी मतदारसंघातील सर्वच प्रमुख ठिकाणी बैठका पार पडतील, असे दिंडे यांनी स्पष्ट केले. या बैठकींना शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख, जेष्ठ नेते, उपनेते यासह स्थानिक पदाधिकारी हजर राहणार आहेत.

भाजपने असा प्रयोग गत महिन्यात केला. मात्र, महायुतीतील घटक पक्षांनी भाजपवरच रोष व्यक्त केला. ठिकठिकाणी असाच अनुभव आल्याने मनोमिलन बैठकांचे सत्र बंद करण्यात आले. आता महाआघाडी यासाठी पुढे सरसावली असून, येथे काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT