BJP celebrations in Dhule

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

चर्चा महाविकास आघाडीची; निवडणुकीत मात्र भाजप दणदणीत विजयी!

धुळे महापालिकेच्या प्रभाग पाचमधील विजयी आरती पवार यांसह जल्लोष करताना महापौर प्रदीप कर्पे व कार्यकर्ते.

Sampat Devgire

धुळे : डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत लाट असताना प्रभाग ५ (ब) ची जागा भाजपला (BJP) मिळालेली नव्हती. तीन वर्षांनंतर पोटनिवडणुकीत मात्र ही जागा देखील भाजपने खिशात टाकली. यामध्ये भाजपच्या आरती पवार (Arti Pawar) यांनी चार हजार ४०८ मते मिळवून बाजी मारली.

या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता देवरे यांना अवघी एक हजार ६१४ मते मिळाल्याने या निकालामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे संख्याबळ ५० वरून ५१ झाले. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला.

शहरातील प्रभाग ५ (ब) पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत बुधवारी (ता.२२) महापालिकेच्या जुन्या इमारतीत सकाळी दहाला मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी आशा गांगुर्डे, नारायण सोनार आदी उपस्थित होते. एकाच जागेसाठी मतमोजणी व एकूण मतदानही केवळ सहा हजार ६०९ झाल्याने अर्ध्या तासातच निकाल लागला. निवडणुकीत भाजपच्या आरती पवार पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. शेवटच्या पाचव्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवली. श्रीमती पवार यांना चार हजार ४०८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या अनिता देवरे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविली. त्यांना एक हजार ६१४ मते मिळाली. अन्य दोन उमेदवारांमधील अपक्ष उमेदवार विद्या नांद्रे यांना ३१५, तर मनसेच्या संध्या पाटील यांना १४० मते मिळाली.

शहरातील प्रश्‍न, समस्यांवरून तीन वर्षांपासून विरोधी पक्षांकडून महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, अस्वच्छतेप्रश्‍नी विरोधकांची ही टीका अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अशी स्थिती असताना प्रभाग-५ (ब) मधील नागरिकांनी भाजपच्या उमेदवार श्रीमती पवार यांना निवडून दिल्याने भाजपने विरोधकांवर टीकास्त्र सोडत विजयाचा जल्लोष केला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

विजयी उमेदवार श्रीमती पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे भरवून व आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. श्री. अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर भगवान गवळी यांच्यासह उपस्थितांनी ठेका धरला होता. ‘धुलिया तो एक झॉँकी है, साक्री अभी बाकी है’ अशा घोषणाही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्या. प्रभाग पाचची निवडणूक भाजपचे नेते व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीही प्रतिष्ठेची केली होती. त्यात त्यांची सरशी ठरली.

प्रभाग ५ (ब) मधील पोटनिवडणूक निकालाने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. देवपूरला खड्डेपूर म्हणणाऱ्यांच्या तोंडाचे खड्डे बुजवून त्यांना जनतेने गप्प केले आहे. प्रसिद्धीसाठी आंदोलन करणाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे. भाजपच विकास करू शकतो, असा विश्‍वास असल्याने जनतेने आम्हाला कौल दिला आहे.

- प्रदीप कर्पे, महापौर, धुळे

---

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर राहणाऱ्या विरोधकांना तसेच देवपूर भागातील रस्त्यांच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहे, याचे उत्तरच जनतेने मतपेटीतून दिले आहे. रस्ते त्यांनी खराब केले असले तरी आम्ही ते दुरुस्त करू, आम्ही कामाला सुरवातही केली आहे. देवपूरसह धुळ्याचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. भाजपवर विश्‍वास ठेवल्याबद्दल देवपूरवासीयांचे आभार.

- अनुप अग्रवाल, शहर- जिल्हाध्यक्ष, भाजप

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT