BJP News: महायुती होणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. निवडणुकीच्या आधी असलेली ही चर्चा प्रक्रिया सुरू झाल्यावर हवेतच विरली आहे. नाशिक जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी भाजप राजकीयदृष्ट्या एकाकी पडल्याचे चित्र आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. यामध्ये भाजप मोठा भाऊ आहे. बहुतांशी निर्णय आणि कारभार भाजप आपल्या मर्जीनेच करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत महायुती बाबत देखील अशीच घोषणा केली होती.
नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र कुठेही शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांसह भाजपचे नेते महायुती होणार की, नाही याबाबत नेते चर्चा किंवा माहिती देण्यास तयार नाही.
जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि पंचायतीत निवडणुका होत आहेत. यामध्ये चांदवड आणि त्र्यंबकेश्वर भाजपच्या ताब्यात होती. उर्वरित नवनगरपालिकांमध्ये अन्य पक्षांच्या हाती कारभार होता. त्यामुळे भाजपला बहुतांशी नगरपालिकांमध्ये परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी येवला, मनमाड आणि नांदगाव या तिन्ही ठिकाणी उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. येथे त्यांची लढत शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे आणि शिवसेना ठाकरे पक्षाशी असेल.
सिन्नर, ओझर, पिंपळगाव बसवंत, भगूर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून भगूर, इगतपुरी, नांदगाव आणि मनमाड या चार नगरपालिकांमध्ये सत्ता येईल असा दावा केला जात आहे.
चांदवड त्र्यंबकेश्वर आणि सटाणा येथे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र महायुती होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेकडे भाजप नेत्यांचे डोळे लागले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने नगरपालिका निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी तयारी केली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व नगरपालिकांमध्ये उमेदवार देण्याची त्यांची तयारी आहे. मात्र मोजक्या नगरपालिका वगळता महाविकास आघाडीला सध्या तरी मोठा प्रतिसाद दिसत नाही.
या सर्व राजकीय हालचालींमध्ये महायुती विस्कटल्यात जमा आहे. हाच कित्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील गिरवल्या जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील निवडणुकीत भाजप एकटा पडल्याचे चित्र आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.