Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले अन् अजितदादा पहिल्याच दिवशी हेडमास्तर झाले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मालेगावामध्ये राष्ट्रावदीने काँग्रेसला मोठा धक्का देत खिंडार पाडलं आहे. मालेगावामधील काँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद शेख शफी, आसिफ शेख आणि मालेगावच्या महापौर ताहेरा शेख रशीद यांच्यासह काँग्रेसच्या (Congress) एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (Malegaon Congress Corporators join NCP) कोरोना नियमांमुळे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कार्यालयात छोटेखानी समारंभात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी माजी आमदार रशीद शेख यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, माझा त्यांच्याशी १९९९ मध्ये संबंध आला. ते अतिशय पोटतिडकीने मालेगावचा प्रश्न मांडायचे. आता जरी त्यांचे वय झाले असले तरी त्यांची लोकांशी असलेली बांधिलकी कमी झाली नाही. यावेळी बोलताना रशीद शेख यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचा विश्वास पवार यांनी दिला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, पक्षप्रवेशावेळी प्रचंड मोठी सभा मालेगावमध्ये घेवून संपूर्ण मालेगाव परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमय करून टाकू, असा रशीद शेख यांचा आग्रह होता. आमचाही तसाच आग्रह होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमावलीमुळे कार्यक्रम घेणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम मुंबईत घेण्याचे ठरवले आणि त्यानुसार हा कार्यक्रम आज पार पडत आहे.

यावेळी अजित पवार यांनी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शनही केले. तसेच त्यांचे कानही टोचले. त्यामुळे मार्गदर्शन करताना अजितदादा पहिल्याच दिवशी हेडमास्तर झालेले पहायला मिळाले. अजित पवार म्हणाले, तुम्ही आजपासून राष्ट्रवादीचे सैनिक झाले आहात. त्यामुळे जोमाने काम करा. मात्र हे काम करत असताना कुठेही कायद्याचे, नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी घ्या. नाहीतर सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण गेलो आहोत, गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपल्याच घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत अशा आविर्भावत वावरु नका, असे सांगत अजित पवार यांनी पक्षात आलेल्या नगरसेवकांचे कान टोचले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, आम्ही सर्वजण जरूर तुमचेच आहोत. पण तुमच्या कोणत्याही कृतीतुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठेही बदनामी होईल, पक्षाला गालबोट लागेल, पक्षाची प्रतिमा मलिन होईल, शरद पवार यांची मान शरमेने खाली जाईल अशी कृती अगदी छोट्या कार्यकर्त्याकडून देखील घडता कामा नये, याची खबरदारी आपण घ्यायला हवी. आता लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे, ही गोष्ट आपण कटाक्षाने ध्यानात ठेवा. आजपासून तुमची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. तुम्हाला काम करण्याची पूर्ण मोकळीक आहे. त्यामुळे उगीच आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो अशी तुमची भावना होणार नाही, असा विश्वास तुम्हाला देतो असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT