Manikrao Kokate News: सिन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे मतांनी विजयी झाली. ते पहिल्या फेरीपासून पुढे होते. पाचव्यांदा विजयी झालेल्या कोकाटे यांनी सिन्नरचा गड राखल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
या मतदारसंघात आमदार कोकाटे यांना एक लाख बत्तीस हजार ९९७ मते मिळाली. ते एक्केचाळीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उदय सांगळे यांना सत्त्यान्नव हजार ६८१ मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत १.२८ लाख मते महाविकास आघाडीचे शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांना मिळाली होती. हे चित्र यंदा उलटे झाले.
राजकीय पक्षांऐवजी व्यक्तीगत गटाचे राजकारण हे सिन्नर मतदार संघाचे वैशिष्ट्य आहे. सध्या येथे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या विरोधात खासदार राजाभाऊ वाजे असे गट कार्यरत होता. तालुक्याचे राजकारण या दोन गटांमध्येच विभागलेले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत बरीच उलथा पालथ झाली होती.
आमदार कोकाटे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निसटत्या दोन हजार मतांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. तो वचपा त्यांनी यंदाच्या निवडणुकीत काञला. प्रत्येक निवडणुकीत वेगळे चिन्ह आणि पक्ष घेऊन उमेदवारी करणारे अशी त्यांची ख्याती आहे. यंदाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा पुरेपुर लाभ त्यांनी उचलला.
लोकसभा निवडणुकीत व्यक्तिगत आणि व्यावसायिक हित लक्षात घेऊन राजाभाऊ गटापासून अंतर ठेवण्याचे काम उदय सांगळे यांनी केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटाशी सलगी करीत खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. विधानसभा निवडणुकीत वाजे समर्थकांनीही हात राखून काम केल्याचे बोलले जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर ठेवल्याचे बोलले जाते.
उदय सांगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या पक्षाने चाचणी केल्यानंतर देखील त्यांना सिन्नरमध्ये आमदार कोकाटे यांना टक्कर देईल, असा उमेदवार सापडला नाही. तरीही सांगळे यांना प्रवेश देण्यासाठी ताटकळत ठेवण्यात आले होते. अखेर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सिन्नरमध्ये कोकाटे विरुद्ध सांगळे अशी सरळ लढत झाली.
या निवडणुकीत आमदार कोकाटे यांनी आपल्या परंपरेप्रमाणे प्रतिस्पर्धी सांगळे यांच्यावर अगदी कमरेखालचे वार देखील केले. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आमदार कोकाटे आणि सांगळे दोघांचाही राजकीय भूतकाळ त्यासाठी कारणीभूत आहे.
विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये आमदार कोकाटे यांना 97 हजार 11 मते मिळाली होती. आमदार राजाभाऊ वाजे यांना ९४ हजार ९३९ मते मिळाली. कोकाटेंचे मताधिक्य अवघे 2072 एवढे होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना एक लाख 28 हजार 232 मते मिळाली होती. यामध्ये कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांचा देखील स्थानिक उमेदवार म्हणून वाजे यांना छुपा पाठिंबा होता.
त्या निवडणुकीचे पडसाद विधानसभेत उमटलेले दिसले नाही. कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याची मानसिकता वाजे गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यांचा एकत्रित परिणाम निवडणुकीतून दिसले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.