Manikrao Kokate, Ajit Pawar & Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate Politics: आमदार कोकाटे आणि पक्षांतराचे अतूट नाते... यंदा काय होणार?

Manikrao Kokate politics; program was of Bhoomipujan, but discussed about defection of MLA Kokate-आमदार माणिकराव कोकाटे यांचे प्रत्येक निवडणुकीत असते वेगळे चिन्ह, नेत्यांच्या दौऱ्यानंतर होते उलथापालथ हा चर्चेचा विषय.

Sampat Devgire

Manikrao Kokate News: सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि पक्षांतर याचे अतूट नाते आहे.. गेल्या चार निवडणुकांपासून कोकाटे यांनी प्रत्येक वेळी पक्षांतर केले आहे. यंदाही तसाच योगायोग होणार की टळणार याची उत्सुकता आहे.

सिन्नर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार कोकाटे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्या विरोधकांकडे मात्र उमेदवाराचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कोकाटे आणि पक्षांतर हे एक अतूट नाते आहे. यंदा काय होणार याची सध्या चर्चा आहे.

त्याला कारणही तसेच घडले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सिन्नर येथे बंदिस्त जलवाहिन्यांचे भूमिपूजन शुक्रवारी झाले. आमदार कोकाटे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

यापूर्वीही आमदार कोकाटे यांनी ते ज्या पक्षाचे आमदार असतील त्या पक्षाच्या नेत्यांना मतदारसंघात बोलावून धुमधडाक्यात कार्यक्रम केले आहेत. तेवढ्याच धुमधडाक्यात नेत्याची पाठ फिरतात पक्षांतरही घडले आहे.

यंदा आमदार माणिकराव कोकाटे यांची सहावी निवडणूक असेल. यापूर्वी ते चार वेळा सिन्नर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा विजयी झाल्यास ते मंत्री हमखास होतील, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास वाटतो.

विधानसभेच्या २०१४ मध्ये आमदार राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात आमदार कोकाटे पराभूत झाले होते. या सर्व निवडणुकांतील विजय आणि पराजय यामध्ये एक योगायोग आहे. यंदा त्याची पुनरावृत्ती होणार का? याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

आमदार कोकाटे १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. त्यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच, त्यांनी एका रात्रीत शिवसेनेत प्रवेश केला होता. १९९९ मध्ये ते शिवसेनेकडून आमदार झाले.

त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बंडात ते सामील झाले. राणे यांच्या समवेत पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००४ च्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपचे आमदार झाले.

विधानसभेच्या २०१४ मध्ये मात्र त्यांनी पक्ष बदलला नाही. भाजपकडूनच उमेदवारी केल्याने त्यांचे चिन्ह देखील बदलले नाही. त्यात सध्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला. योगायोग म्हणजे त्यावेळेस कोकाटे यांनी पक्षांतर केले नव्हते.

आमदार कोकाटे यांनी २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी केली.या पक्षांतरानंतर ते आमदार झाले. यंदा २०२४ ला ते सहाव्यांदा उमेदवारी करीत आहेत.

यावेळी योगायोग म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मतदारसंघात निमंत्रित केले. मात्र अद्याप ते पक्षातच आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्या चर्चांना महाविकास आघाडी कडून विराम देण्यात आला आहे.

अशा स्थितीत आमदार कोकाटे, निवडणूक आणि पक्षांतर व त्यातील योगायोग याची चर्चा होणे अटळ आहे. यंदाच्या निवडणुकीत कोकाटे यांनी तसे पाहिले तर शरदचंद्र पवार पक्षाला सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडात भाग घेऊन एक प्रकारे पक्षांतर केले आहे. अर्थात त्यांचे निवडणूक चिन्ह बदललेले नाही.

यंदाच्या निवडणुकीतही ते यापूर्वीच्या निवडणुकीचे चिन्ह घेऊन उमेदवारी करतील अशी स्थिती आहे. त्यामुळे सिन्नर मतदार संघ पुन्हा एकदा आमदार कोकाटे त्यांचे राजकारण आणि पक्षांतराचा योगायोग या चर्चेत अडकला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT