Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा उंबरठ्यावर, शनिदेव वाचवणार की खुर्ची जाणार?

Manikrao Kokate : संकटात सापडलेल्या कोकाटे यांनी काल (दि.२६) शनिदेवाच्या चरणी धाव घेतली. त्यांनी शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनी मंदिरात अभिषेक व विशेष पूजा केली. त्यांनी शनिदेवाला साकडं घातलं.

Ganesh Sonawane

Manikrao Kokate : शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्याने व विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळल्याचा ठपका असल्याने राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद धोक्यात आले आहे. विरोधकांनी अजित पवार यांच्यासह सरकारवर दबाव आणल्याने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर आजच फैसला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांनी मंगळवारी यांसदर्भात निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं. मात्र, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच कोकाटेंबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. तर दुसरीकडे छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे यांनीही कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. अजित पवार यांनी मंगळवार पर्यंत वाट पाहा असं त्यांना सांगितलं होतं. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी खलबंत झालं. तर शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार हे देखील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. ते नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची व भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी होण्याच्या चर्चांना अधिक जोर आला आहे. त्यामुळे मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाच्या राजीनाम्या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कोकाटे यांची उचलबांगडी केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रिपदावरुन दूर करुन मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो की त्यांना एखादे दुसरे खाते दिले जाते. नेमका काय निर्णय घेतला जाईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान संकटात सापडलेल्या कोकाटे यांनी काल (दि.२६) शनिदेवाच्या चरणी धाव घेतली. त्यांनी शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनी मंदिरात अभिषेक व विशेष पूजा केली. आपल्यावरील साडे सातीचे संकट दूर होऊ दे यासाठी त्यांनी शनिदेवाला प्रार्थना केली. त्यांच्या नंदुरबार दौऱ्याची व शनिपूजेची कालपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांच्या साडेसातीपासून कोकाटेंची सुटका शनिदेव करणार का? कोकाटे यांचे मंत्रिपद शनिदेव वाचवणार का? हे पाहावे लागणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात याच मंदिराच्या दर्शनापासून केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे कोकाटे यांनीही राजकीय अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी शनिदेवाला साकडे घातल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT