BJP leader Ganesh Dhatrak celebrates after being elected unopposed as Chairman of the Manmad Agricultural Produce Market Committee (APMC). Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manmad APMC : आमदार सुहास कांदेंना मोठा धक्का! 'मनमाडचा किंग' पुन्हा पॉवरमध्ये, भाजपचे गणेश धात्रक बिनविरोध सभापती

Ganesh Dhatrak Manmad APMC, Suhas Kande : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला आहे. मनमाड बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. गणेश धात्रक हे बिनविरोध सभापती झाले आहेत.

Ganesh Sonawane

Suhas Kande News Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संजय पवार हे सुहास कांदे यांची साथ सोडून पुन्हा धात्रक गटाला जाऊन मिळाल्याने येथील बाजार समितीवर आता भाजपचा झेंडा फडकला आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक यांची आज बिनविरोध निवड झाली. माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बाजार समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली.

निवड प्रक्रियेच्या विशेष सभेत गणेश धात्रक यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. विशेष निवड सभेत गणेश धात्रक यांच्यासमवेत ११ सदस्य उपस्थितीत होते. तर सुहास कांदे यांच्या विरोधी गटाचे सहा सदस्य गैरहजर होते. या प्रसंगी मनमाडमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तयार करण्यात आला होता. मनमाड शहराला पोलिस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. तब्बल २५० पोलिस शहरात तैनात होते. या निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडत ढोल-ताशांच्या गर्जात एकच जल्लोष केला.

गणेश धात्रक, संजय पवार व दीपक गोगाड यांनी एकत्रित बाजार समितीचे संचालक मंडळ निवडून आणलं होतं. तिघांच्या पॅनलची बाजार समितीवर सत्ता बसली. संजय पवार हे पहिल्यांदा सभापती झाले त्यानंतर दुसऱ्या टर्मला दीपक गोगड झाले. त्यानंतर गणेश धात्रक यांना शह देण्यासाठी सुहास कांदे यांनी संचालक फोडले. संजय पवार यांच्या नेतृत्वात संचालकांचा एक गट वेगळा झाला व तो सुहास कांदे यांना जाऊन मिळाला. मात्र, काही अडचणींमुळे सभापती दीपक गोगड हेच होते. मात्र, त्यानंतर गोगड याचं पद रद्द करण्यात आलं. मग, सुहास कांदे यांच्याकडून संजय पवार हे पुन्हा सभापती झाले होते.

मात्र, सुहास कांदे यांच्यासोबत झालेल्या अंतर्गत मतभेदामुळे संजय पवार यांनी पुन्हा सुहास कांदे यांची साथ सोडली आहे. ते पुन्हा धात्रक गटाकडे आले. पवार, धात्रक व गोगड तिघांनी मिळून सुहास कांदे यांना छोबीपछाड दिला आहे. पवार यांनी धात्रक यांच्यामागे आपल्या बाजूचे संचालकांचे बळ उभे केले. बाजार समितीवर आता भाजपचे गणेश धात्रक सभापती झाल्याने सुहास कांदे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. या सत्ता समीकरणामागे छगन भुजबळ यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांचा अदृश्य हात असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी नवनिर्वाचित सभापती गणेश धात्रक यांनी कांदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले, बाजार समिती हा राजकारणाचा अड्डा व्हायला नको, सभापती असो किंवा कोणताही संचालक त्याला वाटतं की बाजार समितीसाठी आपण चांगलं काम केलं पाहीजे. दीपक गोगड किंवा संजय पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीच्या हिताचे जे-जे प्रस्ताव असतील, ते त्यांनी संबधित विभागाकडे सादर केले. आजतागत त्याला मंजुरी का मिळाली नाही हेच मला समजलं नाही. बाजार समिती हा राजकारणाचा अड्डा व्हायला नको असा टोला धात्रकांनी विरोधकांना लगावला.

कोण आहेत गणेश धात्रक?

गणेश धात्रक यांची मनमाडचा किंग म्हणून ओळख आहे. गणेश धात्रक हे यापूर्वी शिवसेना ठाकरे गटात होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश धात्रक यांचे वडील जग्गनाथ धात्रक हे १९८० व १९९० मध्ये दोनवेळा आमदार होते. आई पद्माताई धात्रकदेखील माजी नगराध्यक्ष राहिल्या आहेत. गणेश धात्रक यांनी स्वत: दोनवेळा नगराध्यक्षपद भूषविले आहे. नगरपालिका निवडणुकीत त्यांना आपल्याच पक्षाने साथ न दिल्याने माघारीची वेळ आली होती. माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नांगी टाकल्याने आमदार सुहास कांदे यांच्या उमेदवाराचा मार्ग सुकर झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT