Dada Bhuse on Manoj Jarange Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपावरून भाजप-शिवसेनेत जुंपली; दादा भुसेंचा थेट भाजपवर हल्लाबोल, म्हणाले "आरोपामागील..."

Dada Bhuse on Manoj Jarange Patil : "मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांमधील गांभीर्य जनतेसमोर आले पाहिजे. या आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. जरांगे यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते सार्वजनिक करावेत, असे आव्हान दादा भुसे यांनी दिले."

Sampat Devgire

Nashik News, 23 Oct : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांकडून शिंदे यांनी आपल्या नावाने ५०० कोटी रुपये आणल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला होता. या आरोपांनंतर आता शिंदे यांच्या समर्थक नेत्यांकडूनही आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

अशातच आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. या आरोपांमुळे शिंदे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता दादा भुसे यांनी या प्रकरणावर भूमिका मांडताना हा विषय भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, जरांगे यांनी केलेल्या आरोपांबाबत भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांमधील गांभीर्य जनतेसमोर आले पाहिजे. या आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. जरांगे यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते सार्वजनिक करावेत, असे आव्हान दादा भुसे यांनी दिले. तसेच, पोलीस यंत्रणेवर विश्वास नसेल, तर न्यायालयीन चौकशीची मागणी करण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर आहे. जरांगे यांना यापैकी कोणताही पर्याय निवडण्याचा अधिकार असून, चौकशीसाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, असे आश्वासनही भुसे यांनी दिले.

दरम्यान, जरांगे यांच्या वक्तव्यांवरून त्यांच्याकडे या प्रकरणाची माहिती आधीपासूनच असल्याचे दिसते. असे असेल तर त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून ही माहिती जनतेसमोर का आणली नाही? त्यांना कोणी रोखले होते? या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधार कोण आहे, याचाही शोध घेतला पाहिजे, असे भुसे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची बाजू घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी असे कोणतेही कृत्य केलेले नाही, असा दावा भुसे यांनी केला. त्यामुळे जरांगे यांनी केलेल्या आरोपांवरून आता राजकीय वर्तुळात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात नेमके काय घडले, आरोपांमागे कोणती तथ्ये आहेत आणि त्याची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT