Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी शेवटच्या आंदोलनाची हाक देत मुंबईत मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. सोमवारी ते मुंबईकडे रवाना होतील. त्यांनी मोर्चाचा मार्ग आणि तारखा देखील जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यांच्या मोर्चाच्या घोषणेनंतर मराठा आंदोलकांमध्येच दोन गट पडल्याचे चित्र आहे.
मागील वेळी जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाला नाशिकमधून मोठी रसद मिळाली होती. मात्र, आता नाशिकमधील मराठा आंदोलकांमध्येच दोन गट पडले आहेत. एक गट तटस्थ तर दुसरा सक्रिय झाला आहे.
मनोज जरांगेंचे सध्याचे आंदोलन हे कुणबीसाठी आणि त्यातही मराठवाड्यपुरते मर्यादीत असल्याचा आक्षेप करण गायकर यांनी घेतला. गायकर यांनी भूमिका मांडताना सांगितले की, एसईबीसी आरक्षणासाठी पाठपुरावा करणार आहोत. कुणबी हा मराठवाड्या पुरता मर्यादित विषय आहे. आम्ही मुंबईला जाणार नाही.
या संदर्भात दोन दिवसांपूर्वी कालिका मंदिर येथे बैठक झाली. त्यात एका गटाने मुंबईला आंदोलनात सहभागी न होण्याचे निश्चित केले. मराठा क्रांती मोर्चाचे विविध नेते त्यात बैठकीला हजर होते.
गायकर आणि काही मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी मुंबईला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे चांदवड, चांदोरी, निफाड, नाशिक, देवळा यांसह विविध ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. राज्य शासनाने जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, एक व्यक्ती म्हणजे समाज नव्हे. नाशिकचे समाज बांधव मुंबईच्या आंदोलनात गतवेळेप्रमाणेच अग्रभागी आहेत, ॲड कैलास खांडबहाले यांनी सांगितले.
मुंबईला झालेल्या गतवेळच्या आंदोलनात नाशिकचे पदाधिकारी आघाडीवर होते. पाच दिवस आधीच नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान येथे जाऊन तयारी केली होती. विविध साहित्य आणि रसद पुरवठा याची जबाबदारी घेतली होती.
यंदाही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नाशिक मधून मोठी रसद मिळेल. नाशिकचे पदाधिकारी सर्वात आधी मुंबईला पोहोचतील. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मदत जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. उद्या सकाळी कार्यकर्ते पूर्वतयारी म्हणून आझाद मैदानावर पोचतील, असे आंदोलनाचे नेते कैलास खांडबहाले यांनी सांगितले.
राज्य शासन जाणीवपूर्वक समाजात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी पडद्यामागून सत्ताधारी आणि सरकारने सूत्रे हलवून काही लोकांना फोडले आहे. मात्र समाज सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील. हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे. फुटीर लोकांना कोणीही थारा देणार नाही, असा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.