Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पेटवणाऱ्या नगर जिल्ह्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार !

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील नगर जिल्ह्यात 6 आणि 7 ऑक्टोबरला येत आहेत.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये समावेश व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न तडीस न्यावा, या मागणीसाठी लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, येत्या 6 आणि 7 ऑक्टोबरला ते नगर जिल्ह्यात येत आहेत.

त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून, भव्य सभेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ते भेट देणार असलेल्या तालुक्यात नियोजनाच्या बैठका सध्या पार पडत आहेत.

कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येनंतर मराठा समाजातील युवांनी पुढाकार घेत कोपर्डी घटना राज्याच्या पटलावर आणली आणि राज्यात एकच संतापाची लाट पसरली. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्यासाठी हजारोंचे मोर्चे नगरमध्ये निघाले आणि त्यातूनच मराठा आरक्षणाच्या मागणीने मोठा जोर धरला.

पुढे राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे 57 मूक मोर्चे शांततामय वातावरणात पार पडले. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आवश्यक असलेल्या आरक्षणाच्या मागणीने पुढे जोर धरून प्रश्न सरकारपुढे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. आता हाच प्रश्न पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी पुढे आणला असून, सरकारने चाळीस दिवसांत यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, सध्या जरांगे पाटील राज्याचा दौरा करत असून, येत्या 6 आणि 7 ऑक्टोबरला ते नगर जिल्ह्यात येत आहेत. आतापर्यंतच्या दौऱ्यात त्यांचे सर्वत्र जंगी स्वागत झाले असून, अक्षरशः जेसीबीने त्यांच्यावर होणारी फुलांची उधळण, जमणारा हजारोंचा जनसमुदाय पाहता मराठा क्रांती मूक मोर्चाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नगर जिल्ह्यातही जरांगे पाटलांचे जोरदार स्वागत करत भव्य सभेची तयारी सध्या सुरू झाली आहे.

6 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील चौंडीत येणार असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता जामखेडमध्ये त्यांची सभा पार पडणार आहे. 7 ऑक्टोबरला पाथर्डी, तिसगाव इथे ते भेट देतील तर सायंकाळी 6 वाजता नगरजवळ एमआयडीसी येथे एका मंगल कार्यालयात त्यांची सभा होणार आहे. नगरमधील होणारे स्वागत आणि सभेच्या नियोजनासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली.

सभा यशस्वी करण्यासाठी मराठा बांधवांच्या डॉक्टर, वकील, इंजिनियर, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक अशा सर्व स्थरांतून पाठिंबा मिळत असून, लाखोंच्या संख्येने सभेला मराठा समाजाच्या बांधवांची उपस्थिती राहील, असा विश्वास या वेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT