Assembly election 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर नांदगाव मतदारसंघात गेले महिनाभर मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. येथे पाच मराठा उमेदवार आहेत. यातील एका डॉ रोहन बोरसे या उमेदवाराचे गावोगावी स्वागत होत होते. त्यामुळे आता सर्व उमेदवार एकत्र बसून एक उमेदवार देणार आहेत.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. नांदगाव मतदार संघात गेले पंधरा दिवसांपासून मराठा महासंघाच्या पाठिंब्यावर डॉ रोहन बोरसे हे मतदारसंघात प्रचार करीत आहेत.
त्यांना मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचाही पाठिंबा अपेक्षित होता. यासंदर्भात रविवारी सर्व पाचही उमेदवार आणि पदाधिकारी अंतरवेली सराटी येथे गेले होते. त्या ठिकाणी मतदारसंघाची राजकीय स्थिती मांडण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेत नांदगाव मतदार संघातून निवडणूक करण्याचा निर्णय झाला.
मात्र त्यानंतरच्या निर्णयात मनोज जरांगे पाटील यांनी लढायचे नाही तर फक्त पाडायचे ही भूमिका घेतली. त्यामुळे आता हे सर्व पदाधिकारी नांदगावला परतले आहेत. आज सकाळी या उमेदवारांमध्ये संपर्क झाला.
आज दुपारी या पाचही उमेदवारांमध्ये एकत्र चर्चा होऊन एकच उमेदवार देण्याचा निर्णय होणार आहे. त्याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नांदगाव मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाने आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली आहे. श्री धात्रक आणि अपक्ष डॉ रोहन बोरसे हे स्थानिक उमेदवार आहेत.
या मतदारसंघातून डॉ बोरसे, पंकज खताळ पाटील, प्रशांत पवार, नाना बच्छाव आणि विशाल वडघुले अशा पाच मराठा समाजाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पाचही उमेदवारांतून एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी स्थानिक पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. आज दुपारी बारा वाजता याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
नांदगाव मतदार संघात मनोज जरांगे पाटील फॅक्टर प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच माजी खासदार भुजबळ यांचे विरोधक व आमदार कांदे यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती.
मात्र जरांगे पाटील यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील विविध कार्यकर्ते श्री जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डॉ बोरसे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता.
आता जरांगे पाटील यांनी उमेदवारी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात हे पाचही उमेदवार एकत्र येऊन निवडणूक लढवावी. या मताशी सहमत झाले आहेत. त्यांना स्थानिक राजकीय नेते व कार्यकर्ते यांचादेखील दबाव आहे. त्यामुळे जरांगे पाटील फॅक्टर अदृश्यपणे नांदगाव मतदार संघात सक्रिय राहील अशी चिन्हे आहेत.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.