Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse Allegation: गिरीश महाजनांच्या आशीर्वादाने अनेक गुन्हेगार सेटल झाले

Sampat Devgire

Jalgaon Politics : भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या कामकाजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले. मंत्री महाजन यांचे विविध गुन्हेगारांना आर्शीवाद आहेत. त्यांच्या समर्थकांकडून गुटखाविक्री होत असल्याची खळबळजनक माहिती त्यांनी दिली. (NCP leader Eknath Khadse criticized BJP Minister Girish Mahajan)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील गुन्हेगारांना महाजन यांचे आर्शीवाद असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

शहरातील बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी हा आरोप केला आहे. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांना नांद्रा येथील पदाधिकारी राजेंद्र गांगुर्डे यानी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली.

यावेळी त्यांनी आरोप केला की, गिरीश महाजन यांचा नाशिकचा कार्यकर्ता तसेच आरोग्यदूत तुषार जगताप हा ‘गुटखाकिंग’ आहे. त्याच्याकडून जामनेर तालुक्यातील नेरी, नांद्रा यासह परिसरात दर आठवड्याला दहा, बारा लाखांचा गुटखा विकला जातो.

श्री. खडसे म्हणाले, की महाजन यांचे दुसरे नाशिकचे सहकारी कोष्टी याच्यावरही मोक्का लावण्यात आला आहे. महाजन यांच्या आशीर्वादाने अनेक गुन्हेगार जळगाव जिल्ह्यात सेटल होत आहेत.

सरकार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवत आहे. मात्र नागरिकांना दाखल्यांसाठी महिना महिना वाट पाहावी लागत आहे. खडसे यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यातील ४४ गावांमध्ये कामे मंजूर असूनही योजना ठेकेदाराचे भले करणारी आहे. याबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोदवड नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेबाबत पत्रकारांनी विचारले असता, ओडीए ९२ कोटीची योजना झाली आहे. त्या जलवाहिनीची एका वर्षापासून पडताळणी घेतली जात आहे. प्रत्यक्ष जलवाहिनी सुरू का करण्यात येत नाही, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी गटनेता कैलास चौधरी, रामदास पाटील, गटनेता जफर शेख, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT