Students in School
Students in School Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कन्नड भाषिकांची संख्या लक्षणीय, पण बोलबाला मराठी शाळांचाच...

सरकारनामा ब्यूरो

तात्या लांडगे

Solapur : कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर व अक्कलकोट आमचेच असल्याचे वक्तव्य करीत जुन्या वादाला नवे तोंड फोडले. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला येण्या-जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत, शेतीला पाणी नाही,शिक्षणाची पुरेशा सोयी-सुविधा नाहीत असे म्हणत दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील २८ गावातील नागरिकांनी पायाभूत सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकात जायला परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे. त्यामुळे आमच्या तालुक्यातील एकही नागरिक कर्नाटकात जायला तयार नाही, असा दावा करणारे लोकप्रतिनिधी तोंडघशी पडले. (Maharashtra - karnataka border Dispute)

मात्र, कर्नाटक सीमेलगतच्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तीन तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६२५ शाळा आहेत. त्याअंतर्गत ५८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्या शाळांमध्ये २२ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे तिन्ही तालुक्यात कन्नड भाषिकांची संख्या लक्षणीय असतानाही तेथे कन्नड माध्यमाच्या केवळ ७८ शाळा आहेत. कन्नड माध्यमापेक्षाही मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्रातील सीमावर्ती प्रत्येक गावांमध्ये महावितरण’ची वीज पोहोचली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली.

दुसरीकडे दोन्ही तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक असून त्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी स्पष्ट केले. वीज आणि शिक्षण या बाबी सोडून रस्ते, पाणी या सुविधांवरून सीमावर्ती भागातील गावकरी कर्नाटकात जाण्याची भूमिका घेत असल्याची स्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. जवळपास अडीचशे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. पण सीमावर्ती भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अधिक आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

तिन्ही तालुक्यातील शाळांची स्थिती

६२५

एकूण शाळा

५७, ७०१

विद्यार्थी संख्या

७८

कन्नड शाळा

२,५२३

एकूण शिक्षक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT