Satish Kulkarni News | Nashik NMC election News Nashik
उत्तर महाराष्ट्र

महापौर सतीश कुलकर्णी रणांगणात उतरणार नाही!

शेवटच्या महासभेत, पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडण्याची केली घोषणा

Sampat Devgire

नाशिक : प्रथम नागरिक (Mayor) म्हणून शहराचे आरोग्य सांभाळणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी नगरसेवकपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर करताना पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे शेवटच्या महासभेत (NMC) जाहीर केले. (Satish Kulkarni News)

महापालिकेची या पंचवार्षिकमधील नगरसेवकरांची अखेरची महासभा झाली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी(Satish Kulkarni) म्हणाले, अडीच वर्षाच्या कार्यकाळात शहराच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगताना काम करताना काही प्रसंगी वाद झाले असले तरी तो कामाचा भाग होता. परंतु मने दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

शेवटच्या महासभेत महापौर कुलकर्णी यांनी सभेचा समारोप करताना भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, अडीच वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न केले. विकासकामांमुळे शहर मेट्रो सिटीकडे वाटचाल करत आहे. शहर बससेवा, लवकरच येणारी मेट्रो निओ सेवा, नमामि गोदा प्रकल्पाची पायाभरणी, आयटी हब, बीओटी, लॉजिस्टिक पार्क, जलकुंभ, शौचालये, रस्ते, उद्याने, गटारी यासारखी महत्त्वाची कामे पूर्ण केली. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, पदोन्नती, कोरोनाकाळात पुरविलेल्या वैद्यकीय व आरोग्य सेवा पुरविल्याचे समाधान आहे. पुढील सत्ताकाळात प्रकल्पांची परिपूर्ती होईल, अशी अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले, दुजाभाव न करता सर्व नगरसेवकांची कामे केली. विकासाची कामे करताना सभागृहाची गरिमा राखली. मनुष्यबळाचा अभाव, उत्पन्नाचे स्रोत कमी असतानाही विकासाचा वेग कायम ठेवला. महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी करताना जवळपास दीड हजार कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्नाचे स्रोत तयार केले.

पंचवीस वर्षे नगरसेवक म्हणून काम करताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपने संधी दिल्यानंतर पुढील काळात महापालिका निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वी ठरविले होते त्यामुळे आता सभागृहात भेट होणार नसल्याची खंत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यापुढे पक्षाच्या कार्यात सहभाग राहील. पक्ष देईन ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगताना आपला वारसदार कर्तृत्वाने ठरेल असे सांगत त्यांच्या नंतर घरातून नगरसेवक कोण, याबाबतचे गुपित कायम ठेवले.

नाराजी अन् खंतही

विकासकामे करताना शासनाकडे वांरवार मागणी करूनही कार्यकाळात नोकरभरतीचा प्रश्‍न सुटला नाही, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने घरपट्टी-पाणीपट्टीची वसुली पुरेशा प्रमाणात झाली नाही. मानधनावर भरती करताना प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. बीओटी प्रकल्पाला चालना मिळू शकली नाही व आयटी हब प्रकल्पाचे भूमिपूजन लांबल्याची खंत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT