Gulabrao Patil -Sureshdada Jain
Gulabrao Patil -Sureshdada Jain Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sureshdada Jain : शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने घेतली सुरेशदादा जैनांची भेट : म्हणाले,‘त्यांचे बोट धरूनच राजकारणात आलो...’

कैलास शिंदे

जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचेच बोट धरून आपण राजकारणात आलो आहोत, असे विधान शिवसेना शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. आज (ता. १५ डिसेंबर) त्यांनी सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. (Minister Gulabrao Patil met former minister Sureshdada Jain)

राज्याचे मंत्री सुरेशदादा जैन हे घरकुल गैरव्यवहारात नियमित जामीन मिळाल्यानंतर जळगावमध्ये आले आहेत. आज त्यांना भेटण्यासाठी सकाळपासून चाहत्यांची गर्दी होती. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या शिवाजी नगरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी त्यांनी जैन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, सुरेशदादा जैन आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचे बोट धरूनच आपण राजकारणात आलो आहोत. बऱ्याच दिवसांनी ते जळगावात आले. त्यांची भेट आज आपल्याला घेता आली. वडिलकीच्या नात्याने राजकारणात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. मला त्यांचं दर्शन घेता आलं, त्यामुळे स्वत:ला मी भाग्यवान समजतो.

पाटील म्हणाले की, जळगावचा पालकमंत्री म्हणून आपण त्यांचे जळगाव शहरात स्वागत करतो. आजपर्यंत त्यांनी जनतेला वेळ दिलेला आहे. आता ते आपल्या कुटुंबाला वेळ देणार आहेत. हे करीत असताना त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे आणि आमच्या काही चुका होत असतील तर त्याही सांगाव्यात. शहराच्या विकासाकरिता त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, अशीच आमची अपेक्षा राहणार आहे.

सुरेशदादा मुंबईत होते, तरी त्यांचे लक्ष जळगावात होते. ‘पक्षी फिरे आकाशी, त्याचे लक्ष पिलापाशी’ अशी अवस्था त्यांची होती. राजकारणाच्या मैदानात त्यांनी उतरावे अशी आपलीही इच्छा आहे. मात्र, तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT