Nagar Urban Bank Member Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Urban Bank News : मंत्री, खासदार, आमदारांनी बँक बुडवणाऱ्यांना जवळ करू नये; 'नगर अर्बन'च्या ठेवीदारांचा इशारा

Ganesh Thombare

Ahmednagar News: गेल्या 113 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. बँकेत अडकलेल्या ठेवी मिळवण्यासाठी ठेवीदार आणि सभासदांची रविवारी एकत्र बैठक झाली. बँकेला बुडविणाऱ्या संचालकांविरोधारात कारवाईसाठी या बैठकीत बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर सकाळी अकरा वाजता मोर्चा नेण्याचा निर्णय झाला.

परंतु या बैठकीत दोषी संचालकांना मंत्री, खासदार आणि आमदारांनी जवळ करू नये, असे आवाहन करत ठेवीदारांनी मराठा आरक्षणासाठी एकटे लढणारे मनोज जरांगे यांच्यासारखे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.

नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना चार ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेने रद्द केला. पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना दोन टप्प्यात त्यांचे पैसे मिळाले. परंतु तिसऱ्या टप्प्याचे 42 कोटी मिळालेले नाहीत. याशिवाय पाच लाखांवरील 1600 वर ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये बँकेत अडकलेले आहेत.

बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, ठेवीदार डी.एम.कुलकर्णी यांनी बैठकीचे ठेवीदार आणि सभासदांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी, अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा,राजेंद्र काळे, आर.डी.मंत्री.एस.झेड.देशमुख, प्रकाश गांधी, महेश देवरे, संजय झिंजे, बहिनाथ वाकळे उपस्थित होते.

राजेंद्र चोपडा यांनी बँकेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्व विभागांशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य हादरून सोडणारे मनोज जरांगेंसारखे आंदोलन करावे लागेल. तो एकटा माणूस 15 दिवस उपोषणाला बसला होता. तर त्यांनी राज्य हलवून टाकले होते. त्यांच्यासारखे आपल्याला आंदोलन करून आपल्याला बँक वाचवावी लागेल, असे राजेंद्र चोपडा म्हणाले.

पालकमंत्री विखेंना ठेवीदारांचे आवाहन

गेल्या 113 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक बुडली असून, ती बुडवण्यास कारणीभूत असलेल्या संचालकांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेऊन फिरू नये, असे आवाहन ठेवीदारांनी यावेळी केले. मंत्री, खासदार आणि आमदारांबरोबर फिरल्यावर दोषी संचालकांवर पोलिसांना कारवाईला मर्यादा येतात. यासंदर्भात लवकरच पालकमंत्री विखेंना भेटणार असल्याचा निर्णय ठेवीदारांनी बैठकीत घेतला.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT