Shivsena Shinde News: भारतीय जनता पक्षाने राज्यातील 40 बंडखोरांना निलंबित केले आहे.. कारवाई झालेल्या भाजपच्या या बंडखोरांमध्ये पाचोर्याचे भाजप बंडखोर अमोल शिंदे यांचा समावेश नाही. त्यामुळे आमदार किशोर पाटील चांगलेच संतापले आहेत.
पाचोरा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी त्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. येथील बंडखोर अमोल शिंदे यांनी भाजपची यंत्रणा आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे.
भारतीय जनता पक्षाने बंडखोरी केलेल्या महाराष्ट्रातील 40 उमेदवारांवर कारवाई केली आहे. त्यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. मात्र या यादीत एरंडोल चे माजी खासदार ए. टी. पाटील आणि पारोळा येथील भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचा समावेश नाही.
भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. पक्षाची सर्व यंत्रणा बंडखोर शिंदे यांच्यासाठीच काम करीत आहेत. त्यामुळे येथे निवडणुकीत भाजप बंडखोर हमखास विजयी होईल, असा प्रचार सुरू आहे.
भाजप बंडखोरांच्या या प्रचारामुळे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार पाटील चांगलेच संतापले आहेत. त्यांनी हा अपप्रचार असल्याचा दावा केला. त्यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तातडीने पाचोरा मतदारसंघातील शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढवीत आहे. अशा 40 लोकांना बडतर्फ करण्यात आले आहे.
मात्र जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी करीत आहेत, त्यांच्यावर अशी कारवाई झालेली नाही असा खुलासा केला आहे. याबाबतची माहिती आमदार पाटील यांनी आज पत्रकारांना दिली.
ते म्हणाले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विचारशील आहेत. ते कोणत्याही फसव्या प्रचाराला बळी पडणार नाहीत. हे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्याला आश्वासित केले आहे.
पाचोरा मतदारसंघासाठी गुजरात येथील माजी उपमहापौर प्रेमलसिंग मोहोळ हे निरीक्षक आहेत. त्यांनी आपली व्यक्तिशः भेट घेतली. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचाच प्रचार करतील, असे आपल्याला सांगितले आहे, असा दावा आमदार पाटील यांनी केला.
जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 मतदारसंघांसाठी भाजपने स्वतंत्र निरीक्षक नियुक्त केले आहेत. ते देखील लवकरच जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहे. त्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांचे सर्व पितळ उघडे पडेल. महायुतीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते एक संघ आहेत. विधानसभा निवडणुकीत हे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे प्रचारात उतरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. त्यामुळे बंडखोरांनी कितीही अपप्रचार केला तरीही महायुतीच्या उमेदवाराला कोणताही धोका पोहोचणार नाही. गेल्या निवडणुकीतही भाजपच्या बंडखोरांनी असाच अपप्रचार केला होता. त्यामुळे निवडणूक तुळशीची झाली होती. यंदा मात्र ही निवडणूक एकतर्फी असून शिवसेना शिंदे पक्षाचा उमेदवार विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.