राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News : मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने मिरजगाव (ता.कर्जत) येथे व्यापारी संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये लोकांकडून आमदार राम शिंदे यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेची मागणी करण्यात आली. त्यानंतर राम शिंदे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांना फोनद्वारे ही मागणी सांगितली. यानंतर लगेच त्यांनी तात्काळ नवीन राष्ट्रीयकृत बँकेची शाखा निर्माण करण्यासंदर्भात मागणी अर्जानंतर सर्व्हे टीम पाठवतो आणि शाखा मंजुरी देऊन मी उद्घाटनासाठी येतो, असे आश्वासन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 ला देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर 2023 पर्यंतच्या वर्षात त्यांनी आपला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने देशभर 'मोदी@9' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमाच्यानिमित्ताने देण्यात येत आहे.
देशभर प्रत्येक जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आजी-माजी खासदार-आमदार, नेते, पदाधिकारी यांना विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सांगण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताची झालेली प्रगती, जगभरात देशाचे झालेलं नाव, नागरिकांचा उंचावलेला जीवन स्तर, येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदी यांचा नियोजनात्मक कार्यक्रम आदी विविध गोष्टींच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सध्या कार्यरत आहे.
या निमित्ताने 2024 च्या निवडणुकांचे लक्ष ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. याचाच एक भाग म्हणून आमदार राम शिंदे यांनी आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात 'मोदी@9' या निमित्ताने विविध शहरात गावामध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. अशाच कार्यक्रमाच्यानिमित्ताने मिरजगाव येथे आयोजित एका व्यापारी मेळाव्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी मिरजगावमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेची मागणी आमदार राम शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
त्यानंतर लगेच आमदार राम शिंदे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून मिरजगाव हे मोठं व्यापारी गाव असून नगर-सोलापूर रस्त्यावर असल्याचे सांगितलं. या ठिकाणी असलेली मोठी बाजारपेठ लक्षात घेता राष्ट्रीयकृत बँक नसल्याने व्यापाऱ्यांची अडचण होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री कराड यांनी लगेचच राम शिंदे यांना मिरजगाव येथे लवकरच शाखा उघडण्यात येईल, यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी निरीक्षण करण्यासाठी पाठवण्यात येतील आणि त्यानंतर लवकरच मिरजगावमध्ये शाखा उघडली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच त्या शाखेचे उद्घाटन कार्यक्रमास मी स्वतः येईल, असे आश्वासनही डॉ. कराड यांनी राम शिंदे यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना दिले. यानंतर व्यापाऱ्यांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.