Trimbakeshwar News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. त्यासाठीच नाशिकला खास अधिकाऱ्यांची टीम नियुक्त झाली. या टीमने त्रंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या घरांवर कारवाई केली.
नाशिक महापालिकेच्या हद्दीपासून त्र्यंबकेश्वरच्या हद्दीपर्यंत १५ किलोमीटर मार्गात एमएमआरडीएने कारवाई केली. दोनशेहून अधिक घरे आणि इमारती पाडण्यात आल्या. हे करताना वेगळाच नियम लावून रस्त्यालगत दुतर्फा ५० मीटर जमीन मोकळी करण्याचा प्रस्ताव आहे.
महापालिका हद्दीत आणि त्र्यंबकेश्वर गावात रस्त्याच्या दुतर्फा २२.५० मिटर हा नियम आहे. ग्रामीण भागात तो ५० मीटर करण्यात आला. थोडक्यात त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या शंभर मीटर रुंदी पर्यंत कोणतेही बांधकाम चालणार नाही अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. त्याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
'एनएमआरडीए'च्या या वादग्रस्त कारवाईची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यावर स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी प्रशासनाने या विषयाबाबत वेगळीच माहिती दिल्याचे पुढे आले. त्यातूनच शेतकरी आणि प्रशासन यांच्यात दरी वाढली.
सिंहस्थ कुंभमेळ्यात होणारी गर्दी हा पोलीस आणि प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. गर्दी नियंत्रण करण्यासाठी अनेक तज्ञ आणि वरिष्ठांचे मत घेतले जाते. त्यासाठी क्राऊड मॅनेजमेंट हा गंभीर विषय असतो.
नाशिकला 2003 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी मुळे 36 जणांचा मृत्यू झाला. 2015 कुंभमेळा सुरक्षित पार पडला. मात्र नुकत्याच झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना झाली. हा प्रकार टाळण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असते.
प्रयागराज येथील कुंभमेळा त्रिवेणी संगमावर आणि गंगेच्या दुतर्फा मोकळ्या पटांगणावर होतो. याउलट त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त या बंदिस्त आणि छोट्याशा ठिकाणी मुख्य स्नान होते. येथील गर्दीचे नियोजन पोलीस प्रशासनाला आव्हान देणारे असते.
यापूर्वी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नाशिक ते त्रंबकेश्वर दरम्यान 100 मीटर रस्ता मोकळा करण्याचा मार्ग शोधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला त्याचा खुलासा केला. आता या संदर्भात फेर आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शिष्टमंडळातील नवनाथ कोठुळे यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली.
कोणत्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव दिला, हे पुढे आले नाही. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती लक्षात घेता त्र्यंबकेश्वरला पर्वणी काळात होणाऱ्या स्नानासाठी 24 तासाच्या कालावधीत गर्दी होते. ती शहरात होते. तेथील दुर्घटना टाळण्यासाठी गतकुंभमेळ्यात 'होल्ड अँड रिलीज'ही कार्यपद्धती स्वीकारली होती. प्रत्यक्ष कुशावर्त येथून दहा किलोमीटर अलीकडेच खंबाळे येथे गर्दी थांबवली जाते. तोच पर्याय यंदाही अमलात येऊ शकतो. गर्दी पंचवटी किंवा त्र्यंबकेश्वर शहरात होईल. त्यासाठी पंधरा किलोमीटर अलीकडे 100 मीटर परिसरातील घरे आणि इमारती पाडणे कितपत व्यवहार्य आहे, असा प्रश्न पडतो.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.