Raj Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray: हे शेवटचं सांगतो, अन्यथा नाशिकला ऑप्शनला टाकलेच म्हणून समजा!

Arvind Jadhav

Nashik: पदाधिकारी पक्ष वाढविण्यापेक्षा गटबाजी आणि हेवेदावे करतात. त्यामुळे पक्षाची वाढ होत नाही आणि अपयशाचे खापर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फोडले जाते. याचमुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी ‘मनसे ॲप’ने पुढे आणले आहे. नाशिकसाठी हा शेवटचा प्रयत्न असल्याचे ठणकावून सांगणाऱ्या ठाकरे यांना हे ॲप कितपत फायदेशीर ठरते, हे लवकरच स्पष्ट होईल.

खूप दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी पहिल्याच दिवशी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. पक्षातील गटबाजीचा फटका पक्षाला बसतो. त्यामुळे ज्यांना काम करायचे त्यांनी थांबा आणि इतरांनी चालते व्हा, असा कडक इशाराच ठाकरे यांनी दिला. हे शेवटच सांगतो, अन्यथा नाशिकला ऑप्शनला टाकलेच म्हणून समजा, असा निर्वाणीचा इशारा ठाकरे यांनी दिला.

याच दौऱ्यात ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी तसेच आगामी निवडणुकांसाठी डेटा संकलीत करण्यात उपयोगी पडणारे मनसे ॲप सुद्धा दिले. या ॲपच्या माध्यमातून पदाधिकारी जास्तीत जास्त मतदारांना पक्षाशी जोडू शकतात. यानिमित्ताने महत्वाचा डेटाही संकलीत होईल. अॅपचा वापर शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा केला जाणार आहे. या अॅपचा अॅक्सेस शहर आणि जिल्हा प्रमुखांकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात येतो आहे. जवळपास तीन हजार पदाधिकारी असून, अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत हे अॅप पोहचवण्याचे काम होते आहे. यात अॅपचा अॅक्सेस देणाऱ्या पदाधिकारी, मतदाराची नोंद करणारा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता अशी सर्वांची नोंद होईल. यामुळे प्रत्यक्षात कोणी किती काम केले हे स्पष्ट होईल. पक्षाशी जोडलेल्या मतदारांची संख्या यामुळे पुढे येईल. कोणत्या भागात पक्ष कमी पडतो, अथवा कोणत्या भागात पक्षासाठी मतदार इच्छूक आहेत, अशी माहिती राज ठाकरे यांना थेट उपलब्ध होईल, असा दावा करण्यात येतो.

यामुळे पक्षाच्या आड फक्त गटबाजी करणारे उघडे पडतील अशी अपेक्षा मनसैनिकांना आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा या अॅपचा वापर करण्यात येत असून, पक्ष गटबाजीला वैतागलेल्या राज ठाकरे हे अॅप दिलासा देणार का, असा प्रश्न यामुळे चर्चेत आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. मात्र, राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरवणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT