Amit Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amit Thackeray : अमित ठाकरे नगरमधून लढणार? हा शिलेदार त्यांच्यासाठी करतोय तयारी

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर शहर विधानसभा मतदारसंघात राजकीय घाईगर्दी दिसू लागलीय. आमदार संग्राम जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या संभाव्य उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळं ते लोकांपर्यंत जाण्यासाठी संधीच शोधताना दिसत आहे.

महाविकास आघाडीमधून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळं तिथं सध्या तरी चेहरा दिसत नाही. माजी महापौर संदीप कोतकर निवडणुकीच्या मैदानात असणार, अशी चर्चा आहे. यातच मनसे स्वबळावर लढत असल्यानं, त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची उत्सुकता असतानाच 'मनविसे'चे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी थेट अमित ठाकरेंना नगर शहरातून निवडणूक लढण्याचं आमंत्रण दिलं आहे. तशी बॅनरबाजी केली आहे.

अहमदनगर शहरातील गुंडगिरी, ताबेमारी, फसवेगिरी, दहशतमुक्त नगर हे विषय नेहमीच चर्चेत असतात. वरकरणी शांत दिसणाऱ्या नगरमध्ये कधी काय होईल, याचा नेम नसतो. ताबेमारी आणि गुंडगिरीला नगरकर देखील वैतागले आहेत. हाच धागा पकडत सुमित वर्मा यांनी अमित ठाकरेंना (Amit Thackeray) नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचं आमंत्रण दिलं आहे.

अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं गेल्या आठवड्यात मनसे नेते, सरचिटणीस यांच्या बैठकीतून समोर आलं. अमित ठाकरेंनी देखील, तशी इच्छा व्यक्त केली. याशिवाय 'मनसे'च्या (MNS) प्रत्येक नेत्यानं निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, अशी सूचना देखील मांडली होती. अमित ठाकरेंनी इच्छा व्यक्त करताच, त्यांच्यासाठी मुंबईत मतदारसंघाची चाचपणी सुरू केली गेली आहे.

'मनविसे'चे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी मात्र अमित ठाकरेंना नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं आमंत्रण दिलं. तशी नगर शहरातील गजबजलेल्या दिल्ली दरवाजा भागात भलीमोठी बॅनरबाजी केली आहे. "अमितसाहेब नगरची विधानसभा लढवा, रक्ताचं पाणी करू आणि हा ऐतिहासिक विजय घडवू", असं वचन सुमित वर्मा यांनी बॅनरबाजी करताना दिली आहे. सुमित वर्मा यांनी नगर शहरात केलेल्या या बॅनरबाजीकडे विरोधकांचं देखील लक्ष गेलं आहे. त्यावर काय प्रतिक्रिया येतात, याकडं लक्ष लागलं आहे.

आमदार जगतापांच्या छायाचित्रांची बॅनरबाजी

दरम्यान, गणेशोत्सवा पूर्वीपासून नगर शहरात बॅनरबाजीला पेव फुटले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी त्यांच्या छायाचित्रांची गणेशोत्सव काळात मंडळाबाहेर जोरदार बॅनरबाजी केली. मोठमोठाले बॅनर लावले होते. तत्पूर्वी नगर शहरातील रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या कामांची देखील नगर शहरात चांगलीच बॅनरबाजी झाली. तसंच यंदाची नगर विधानसभा निवडणूक सोपी नाही. विरोधात चेहरा नसल्यानं आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काहीसा गोंधळ उडाला आहे. 'मविआ'कडून कोण मैदानात येणार? नेमकं लढायचं कोणाबरोबर? हे माहीत नसल्यानं 'नो रिस्क' म्हणत, आमदारांनी त्यांची यंत्रणा कार्यरत केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT