Workers at sakri police station (File Photo)
Workers at sakri police station (File Photo) Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपचा पाय खोलात?...साक्रीत न्यायाधीशांसमोर दोघांचा जबाब

Sampat Devgire

धुळे : साक्री (Sakri) नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी भाजप (BJP) आणि पराभूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वादाला राजकीय वळण लागले. यात झालेल्या मारहाणीच्या घटनेत मोहिनी जाधव या तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (एलसीबी) तपास सोपविला. या यंत्रणेच्या पथकाने फिर्यादीसह मारहाणीच्या घटनेतील संबंधित भावाचा साक्रीतील न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेतला.

साक्री नगरपंचायतीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात १७ पैकी ११ जागा भाजप, चार जागा शिवसेना, एक काँग्रेस, तर एक जागा अपक्षाला मिळाली. चाळीस वर्षानंतर भाजपला सत्ता मिळाली तरी त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. याच दिवशी भाजपच्या साक्री येथील कार्यालयात सायंकाळी सहाला नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सुरू होता. त्यावेळी भाजपच्याच एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत महिला उमेदवाराच्या मुलाला भाजप कार्यालयाजवळ बोलाविल्याचा संशय व्यक्त झाला. त्यात संबंधित महिलेचा कार्यकर्ता मुलगा गोटू जगताप हा भाजप कार्यालयाजवळ उपस्थित झाला. त्यावेळी त्याला भाजपच्या काही समर्थकांनी मारहाण केली. ही घटना समजल्यावर जगताप याची बहिण माया पवार, चुलत बहिण मोहिनी जाधव, विषू पवार, देव बाबर घटनास्थळी पोचले. त्यावेळी झालेल्या वादात मोहिनीचा मृत्यू झाला.

या प्रकरणी माया पवार हिच्या फिर्यादीनुसार मनीष गिते, रमेश सरक, उत्पल नांद्रे व अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नंतर जखमी जगताप याने एलसीबीकडे संघपाल मोरे, आधार बोरसे, नितीन देवरे, ॲड. गजेंद्र भोसले यांच्याविरुद्ध जबाब दिला. यानुसार एकूण संशयित सात जणांसह अन्य पाच ते सहा जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनातून आणखी काही संशयितांच्या नावात वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, तपासाप्रमाणे आणि फिर्यादीसह तिच्या भावाच्या जबाबानुसार नावे समाविष्ट केल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा एलसीबीने साक्रीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. टी. अढायके यांच्यासमोर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ प्रमाणे फिर्यादी माया पवार, तिचा भाऊ गोटू जगताप यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT