Moneylender
Moneylender Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सावकाराची करामत; कर्ज दिले दोन लाख, वसुली केली २३ लाख!

Sampat Devgire

धुळे : जिल्ह्यातील राज्यस्तर समाजकल्याण विभागाचा शिपाई रवींद्र शिरसाट हा अवैध सावकार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या व्यवसायासाठी त्याला अभय कुणाचे, याचाही शोध पोलिसांनी घेण्याची मागणी होत आहे. (Social welfare department`s peon was involve in moneylending)

अवैध सावकार शिरसाट याने मासिक दहा टक्के व्याजदराने दोन लाखांचे कर्ज दिले. त्यापोटी २३ लाख रुपये वसूल करूनही तो असमाधानी राहिला. त्याने तक्रारदाराची शेती जबरदस्तीने नावावर करून घेतली. मूळ कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सावकार शिरसाट याने संबंधित कुटुंबाला त्रास देणे सुरू केले. पीडित कुटुंबाच्या घरी जाणे, शिवीगाळ व दमदाटी करणे सुरूच ठेवले. त्यामुळे तक्रारदार पीडित तरुणाने अवैध सावकार शिरसाट याच्यासह तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

धुळे शहरातील जमनागिरी रोड परिसरात भावसार कॉलनी आहे. तेथील प्लॉट क्रमांक २५ मधील रहिवासी महेश माधव मोरे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१२- १३ मध्ये भावसार कॉलनीतच प्लॉट क्रमांक ३३ मधील रहिवासी रवींद्र अर्जुन शिरसाट आणि भिकूबाई अर्जुन शिरसाट यांच्याकडून फिर्यादीचे वडील माधव शंकर मोरे यांनी दोन लाखांचे कर्ज घेतले होते.

मोरे यांच्या कर्जाच्या व्याजाचा वार्षिक दर तब्बल १२० टक्के आकारला. व्याज आणि मुद्दलापोटी दरमहा वीस हजार याप्रमाणे २०१७ पर्यंत दहा लाख ८० हजार रुपये फेडले. त्यानंतर मे २०१९ मध्ये चार लाखांचा धनादेश, तसेच ३ डिसेंबर २०१९ ला आठ लाख ४० हजार किमतीची सोंडले (ता. शिंदखेडा) शिवारातील गट क्रमांक ८९/१/ब मधील शेती शिरसाटच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार किरण मच्छिंद्र जाधव (रा. विखे नगर, शेलारवाडी, चितोड रोड, धुळे) याच्या नावावर जबरदस्तीने करण्यास भाग पाडण्यात आले.

आतापर्यंत शिरसाटला व्याजासह २३ लाख २० हजार रुपये परत केले आहेत. असे असताना कर्ज घेणारे माधव शंकर मोरे यांचे निधन झाले. तरीही या संशयित तीन सावकारांनी (स्व.) माधव मोरे यांच्या घरी जात मुलगा महेश व कुटुंबीयांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानुसार संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT