Ahmednagar News: पाथर्डीत भाजप अंतर्गत राजकीय घमासान पाहायला मिळत आहेत. आमदार मोनिका राजळे आणि भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्यात राजकीय वाद वाढू लागला आहे. आमदार राजळे यांचे कट्टर समर्थक विष्णूपंत अकोलकर यांनी गोकुळ दौंड यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राजळे गटाकडून दौंड यांची राजकीय कोंडी होणार, असे दिसते आहे.
भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी पाथर्डी-शेवगावमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी बेमुदत उपोषण केले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे शेवगावमधील क्षितिज घुले यांनी पाठिंबा दिला. दौंड-घुले यांनी आंदोलनाच्या व्यासपीठावर एकत्र येत कार्यकर्त्यांसह आमदार राजळे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार राजळे यांना दुष्काळाच्या मुद्द्यावरून पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकटे पाडण्याचा प्रयत्न यामागे होता. यावर आमदार राजळे यांनी संयमाची भूमिका घेतली. आमदार राजळे यांनी काल या आंदोलनावर कडाडून टीका केली.
"राजळे कुटुंबाने त्यांना राजकारणात पदे दिले. त्यांना खूप काही देऊनसुद्धा आमच्याकडून काय चूक झाली ते आता कळत नाही. मात्र, त्यांना सभापती करण्यामध्ये विष्णुपंत अकोलकर यांचा वाटा असून, ती चूक अकोलकर यांनी जाहीररित्या कबूल केली. आता झालेली चूक दुरुस्त करा", असे आमदार मोनिका राजळे यांनी म्हटले आहे.
आमदार राजळे यांच्या या भूमिकेनंतर आता विष्णूपंत अकोलकर हे गोकुळ दौंड यांच्याविरोधात मैदानात आले आहे. विष्णूपंत अकोलकर यांनी साकेगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमात गोकुळ दौंड यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.
अकोलकर म्हणाले, "तुम्ही पंचायत समितीचे सभापती असताना तुमच्या कार्यकाळातील उद्योगाची महिती आमच्याकडे आहे. कोणाला कोणत्या योजना कशापद्धतीने दिल्या ही प्रकरणे सांगायला लावू नका. जाती-जातीमध्ये विष पेरण्याचे काम करून तुम्ही आमदार मोनिका राजळे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहात. ते सहन केले जाणार नाही. तुम्हाला याचे जशास तसे उत्तर दिले जाईल".
गोकुळ दौंड यांच्या पत्नी सुनीता दौंड मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना पंचायत समितीचे सभापतिपद दिले होते. त्यानंतर पंचायत समितीचा पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दौंड व राजळे यांच्यात हळूहळू दुरावा निर्माण झाला. गोकुळ दौंड यांनी आमदार राजळे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत मतदारसंघातील पाटपाणी, एमआयडीसी, युवकांचा रोजगाराचा प्रश्न या मुद्द्यावरून आमदार राजळे यांना लक्ष केले. दुष्काळावरून ही दौंड यांनी स्वपक्षाच्या आमदारावर टीका केली.
"त्यांना सभापती करण्यामध्ये माझी खूप मोठी चूक झाली असून, त्याचे खापर आता माझ्या माथी फोडले जात आहे. सभापतिपदावरून आत्ताच तुम्ही पायउतार झाले नाही, तर लगेच राजळेंच्या विरोधात टीका करायला सुरुवात केली. आता विकासकामांच्या गप्पा मारायला तुम्हाला सुचले का ? अडीच वर्षे तुम्हाला पंचायत समितीचे सभापती म्हणून पद दिले.
तेव्हा का विकासाबाबत बोलले नाही. आता तुम्हाला एमआयडीसीचा प्रश्न कळाला का ? आता विकासाच्या गप्पा मारायला तुम्ही निघाले. राजकारणातील कोणती योग्यता, लायकी नसताना हे आमदार राजळे यांचे विरोधात बोलायला सुरुवात केली. आमदार राजळे यांच्याविरोधात तुम्ही करीत असलेले षडयंत्रात कदापि यश येणार नाही," असेही विष्णूपंत अकोलकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.