NCP MP Bhagre News: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला कांद्याने चांगलाच झटका दिला. विशेषतः राज्यात महाविकास आघाडीला कांदा प्रश्न मदतीला आला होता.
केंद्रातील भाजप सरकारने आठ डिसेंबर 2023 रोजी देशात कांदा निर्यातबंदीची घोषणा केली. त्याआधी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्यात आले होते. त्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. देशभर त्या विरोधात असंतोष होता.
प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी केंद्र शासनाच्या या निर्णयाने चांगलेच होरपळले होते. कांदा निर्यातबंदीने कांद्याचे दर कोसळले. त्यात प्रत्येक शेतकऱ्याला हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला. त्यामुळे केंद्र शासनाविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.
कांदा हा राजकीय विषय बनला. केंद्र शासनाच्या विरोधात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चांदवड येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलन झाले. नाशिक आग्रा महामार्ग ठप्प झाला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा केली होती.
त्याचा मोठा आणि नकारात्मक परिणाम लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर झाला. लोकसभा निवडणुकीत विशेषता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्न गंभीर होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणुकीत केलेल्या मतदानामुळे भाजपचा मोठा पराभव झाला.
कांदा हे राजकीय पीक आहे. कांद्यानेच मला खासदार केले. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भगरे नेहमी सांगत असतात. कांद्याने खासदार भगरे यांना चांगलीच भुरळ घातली आहे.
ही भुरळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे त्यांनी यंदा आपल्या घरचा गणपतीत कांद्याची आरास केली आहे. खासदार भगरे यांच्या कन्या अनुजा यांनी ही आरास केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यातून मांडण्याचा प्रयत्न झाला आहे.
कांदा लागवड कांदा विक्री, कांदा साठवण्याच्या चाळी, कांदा विषयावर आलेल्या बातम्या, केंद्र सरकारच्या धोरणाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, अशा विविध विषयांचा समावेष या देखाव्यात करण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा चर्चेचा विषय आहे.
खासदार भगरे यांच्या घरी रोजच विविध नागरिक, शेतकरी भेट देत असतात. विविध समस्या घेऊन नागरिक आणि कार्यकर्ते येतात. या या सगळ्यांसाठी गणपतीची कांद्याची आरास हा चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.
कांदा प्रश्न नाशिक जिल्ह्यात आणि राज्याच्या विविध भागात नेहमीच आंदोलन आणि राजकारणाचा विषय ठरत आला आहे. मात्र पहिल्यांदाच तो गणेशोत्सवात आरास करण्याचा विषय देखील ठरला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.