Sanjay Raut, Narendra Modi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News : आश्रयदाते उद्योजकांवर हल्ला म्हणजे, मोदींचा पराभव; खासदार संजय राऊत यांचा दावा !

Ahmednagar Lok Sabha Constituency : राम मंदिराचे कुलूप काँग्रेसचे राजीव गांधी यांनी उघडले होते. याचे भान भाजपवाल्यांनी ठेवावे तसेच अमित शहा इंडिया आघाडीत आले तर त्यांना पंतप्रधान करायला आम्ही तयार आहोत.

Pradeep Pendhare

Nagar News : काँग्रेसला अंबानी -अदानींकडून लोकसभेसाठी टेम्पो भरून काळा पैसा मिळवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार खिल्ली उडवली. 'हा आरोप इंटरेस्टिंग आहे आणि यासारखा दुसरा विनोद नाही. अदानी-अंबानी यांना देश विकत घ्यायला ज्यांनी मदत केली आणि उद्योजकांचे 30 लाख कोटींचे कर्ज ज्यांनी माफ केले. त्या आश्रयदात्यांवर मोदींचा हा हल्ला म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभूत झाल्याचे दिसत आहे', असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला. मोदींचे मानसिक आरोग्य बिघडले असल्याने भाजपने त्यांच्या या लाडक्या नेत्यावर उपचार करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

नगरमध्ये महाविकास आघाडीमधील नेते शरद पवार यांच्या उपस्थित उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा झाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सभेसाठी उपस्थित होते. सभेनंतर ते नगरमध्ये मुक्कामी थांबले. संजय राऊत यांनी गुरूवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला, राहुल गांधींना अदानी-अंबानी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी मिळालेल्या काळ्या पैशांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार राऊत म्हणाले,'अदानी व अंबानी यांनी दोन टेम्पो भरून पैसे राहुल गांधींना दिल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिले होते. पण त्याच अदानी व अंबानींचा काळा पैसा त्यांनी आतापर्यंत वापरला आहे व आता ते राहुल गांधींना हा पैसा दिल्याचे सांगतात म्हणजे मोदींना अदानी-अंबानींचा भ्रष्टाचारी व्यवहार माहीत आहे'. त्यामुळे 'ईडी'ने मोदींचे स्टेटमेंट घ्यावे वा कालचे त्यांचे जे यासंदर्भातील स्टेटमेंट आहे, तेच ग्राह्य मानून मनीलाँड्रिंग कायद्यानुसार त्या दोन्ही उद्योजकांवर कारवाई करावी, त्यांना अटक करावी, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.

मोदींच्या अशा वक्तव्यातून असे दिसते आहे की, मोदींचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. या लाडक्या नेत्यावर भाजपने आता उपचार करण्याची गरज आहे. मोदी व शहा नेहमी खोटे बोलतात. त्यांच्यासमवेत जाणार्‍यांनाही हा रोग जडला आहे, असा दावा करून राऊत म्हणाले, 4 जूननंतर एकनाथ शिंदेंचा व अजितदादांचा पक्ष राहणार नाही. आम्ही हे दोन्ही पक्ष तडीपार करणार आहोत. पण मोदी-शहांसमवेत राहून त्यांना खोटे बोलण्याचा रोग झाला आहे. खोटे बोलणे हेच त्यांचे मोठे क्वालिफिकेशन आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

अमित शहांना पंतप्रधान करू

दरम्यान, राम मंदिराचे कुलूप काँग्रेसचे राजीव गांधी यांनी उघडले होते. याचे भान भाजपवाल्यांनी ठेवावे तसेच अमित शहा इंडिया आघाडीत आले तर त्यांना पंतप्रधान करायला आम्ही तयार आहोत, असे भाष्यही खासदार राऊत यांनी केले.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT