Sujay Vikhe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay vikhe: ... अन् खासदार विखेंनी घेतला कार्यक्रम आटोपता

Pradeep Pendhare

Nagar News: पाथर्डीतील भालगावमध्ये शेतकऱ्यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कार्यक्रमाला जाहीररित्या विरोध करून तुम्ही पाच वर्षात काय काम केले, याचा जाब विचारला. त्यामुळे खासदार विखे यांची चांगलीच कोंडी झाली. सोमवारी झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल होत आहे.

खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांचा पाथर्डी तालुका दौरा सुरू होता. पाथर्डी तालुक्यातील भालगाव या ठिकाणी खासदार विखे व आमदार राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साखर, डाळ वाटप तसेच विविध विकास कामांचा प्रारंभ होता. यावेळी खासदार सुजय विखे यांचे भाषण सुरू असताना त्यांच्यासमोर उभे असलेल्या शेतकऱ्यांनी खासदार विखे यांना प्रश्न करण्यास सुरूवात केली.

तुम्ही आमच्या गावात काय विकास केला हे सांगा, येथून निघून जा.. तुम्ही गत पाच वर्षात काय केले? अशा भाषेत प्रश्नांच्या सरबत्ती सुरू केल्या. यावरून प्रचंड गोंधळ झाला. हा गोंधळ पाहून आमदार मोनिका राजळे या व्यासपीठावरून उठून त्यांनी गोंधळ घालणाऱ्याकडे जाऊन शांत राहण्याची विनंती केली.

खासदार विखे यांचे ऐकून घ्या, तरी पण ग्रामस्थांच्या प्रश्नांचा भडीमार खासदार विखे यांच्यावर सुरू होता. खासदार म्हणून तुम्ही पाच वर्षात काय केले सांगा, असा सवाल येथील काही ग्रामस्थ आणि शेतकरी वारंवार विचारत होते. यावर विखे म्हणाले सांगतो मी. परंतु, मात्र पुन्हा ग्रामस्थांनी खासदार विखेंना यांना प्रश्न करत काय.. काय सांगता तुम्ही, आम्हाला तुमच्या योजना येऊन द्या. मगच बोला, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने येथील वातावरण चांगलेच तापले होते.

कार्यक्रमस्थळी बराच काळ गोंधळाची स्थिती होती. व्यासपीठाच्या बाजूने खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उभा होते, तर गावातील काही ग्रामस्ंथ त्यांच्यासमोर बसलेले तर काही ग्रामस्ंथ घेराव घालून एकत्र येत प्रश्न विचारत होते.

आमदार राजळेंनी खासदारांना बोलू द्या. अशी वारंवार विनंती करत होत्या. गोंधळ घालणाऱ्यांना समजावत होत्या. मात्र, आम्हाला गप्प करू नका. बोलू द्या, अशीच भूमिका या ग्रामस्थांनी घेतली. आमदारासमवेत गावातील काही ग्रामस्थांनी खासदारांना सवाल करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु हे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

शेतीसाठी पाणी देतो म्हटले होते, त्याचं काय झालं? आम्ही मतदान केलेले आहे, आम्हाला बोलू द्या. आता मी तुमचा ऐकून घेतल आहे... शांत रहा.. मला बोलू द्या, तुम्ही शांत नाही राहिले, तर मी कसं बोलू शकेल, असे म्हणून खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी सुनावत भालगाव व परिसरात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार विखे म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडीच्या कालावधीत पाणी योजनेचे काम मंजूर करून दिले जात नव्हते, आपलं सरकार आल्यानंतर काम मंजूर झाले. पिण्याच्या पाणी योजनेचे कामाला सुरुवात झाली असून येत्या सहा महिन्यात तुम्हाला पाणी मिळेल, असा मी तुम्हाला, शब्द देतो. मी खासदार म्हणून काय विकास केला या प्रश्नाला विखे यांनी उत्तर देऊन विकास कामांची यादी वाचली.

गावांतर्गत असलेले तुमचे वाद-विवाद हे गावाच्या विकासाच्या प्रश्नावर आणू नका. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे असतात. त्यामुळे वादविवाद घालण्यापेक्षा महिला-भगिनी आल्या आहेत. त्यांना या श्रीरामाच्या प्रसादाचा लाभ घेऊ द्या. आपला वादविवाद चालूच राहील, असे म्हणत विखेंनी कार्यक्रम आटोपता घेतला".

भाजपतंर्गत ठिणगीचा खासदार विखेंना फटका

भालगाव हे गाव भाजपचे विद्यमान तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांचे असून या ठिकाणी त्यांना कडवा विरोध होत आहे. याच गावातील अनेक पुढारी तालुका व गाव पातळीवर राजकारणात सक्रिय आहेत. काही भाजपचे व आमदार राजळे (Monika Rajale) यांचे कट्टर समर्थक असून यांचा कायम कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून खेडकर यांच्याशी संघर्ष सुरू असतो. मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या भालगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत हा संघर्ष ही पाहायला मिळाला. त्या संघर्षाची ठिणगी या कार्यक्रमात पडल्याचे बोलले जात आहे.

(Edited By - Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT