MPSC Drug Inspector Exam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MPSC Drug Inspector Exam : 'खासगी क्लासवाल्याचे 90 प्रश्न अन् उत्तरांचे पर्यायही जुळते'; आयोगाच्या 'औषध निरीक्षक' भरतीत पेपर लिकचा गंभीर आरोप

Fresh allegations raise questions over MPSC Drug Inspector recruitment exam : अहिल्यानगरचे तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांनी औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा दावा करत खासगी क्लासच्या 'गेस पेपर'मधील 90 प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय आयोगाच्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा आरोप केला आहे.

Pradeep Pendhare

MPSC Paper Leak : NEET आणि TET परीक्षा वादानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अहिल्यानगरचे तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांनी माध्यमांसमोर येत या भरती प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

ऋषिकेश गांगर्डे यांच्या म्हणण्यानुसार, खासगी क्लासच्या कथित 'गेस पेपर'मधील 100 पैकी सुमारे 90 प्रश्न आणि त्या प्रश्नांखालील उत्तरांचे पर्यायही आयोगाच्या (MPSC) अधिकृत प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे "क्लास आयोग चालवतो की आयोग क्लास चालवतो?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा (Exam) घेण्यात आली होती. या परीक्षेच्या संदर्भात 22 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेतील 78 ते 90 प्रश्न 20 मार्चलाच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा दावा यापूर्वी दोन उमेदवारांनी केला होता. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील एका उमेदवाराने आपली तक्रार मागे घेतली असली, तरी अहिल्यानगरचे तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांनी आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

गांगर्डे यांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासूनच संशयास्पद बाबी दिसत होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही उमेदवारांना गुणपत्रिका न जाहीर करता थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर गौरव पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधून कथित गैरप्रकारासंदर्भातील काही पुरावे आणि ई-मेलद्वारे केलेल्या तक्रारीची माहिती दिल्याचा दावा गांगर्डे यांनी केला आहे.

गौरव पाटलांनी तक्रारीबाबत गंभीर दावा

गांगर्डे यांच्या म्हणण्यानुसार, 24 जुलै 2026 रोजी त्यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. मात्र कार्यालयीन वेळ संपल्याचे कारण देत तक्रारीची पोच त्यावेळी देण्यात आली नाही आणि ती सोमवारी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसेच गौरव पाटील यांनी दबावामुळे तक्रार मागे घेतल्याचा दावा करत त्यांच्या वडिलांनीही भेट घेतल्याचे गांगर्डे यांनी म्हटले आहे.

तक्रारदाराची चौकशीसाठी मोठी मागणी

गौरव पाटील यांनी तक्रार मागे घेताना हा खासगी क्लासचा 'गेस पेपर' असल्याचे सांगितले. मात्र, जर तो केवळ गेस पेपर असेल, तर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न आणि त्या प्रश्नांखालील उत्तरांचे पर्यायही तंतोतंत कसे जुळले, असा प्रश्न गांगर्डे यांनी उपस्थित केला.त्यांच्या मते, प्रश्नांसह उत्तरांच्या पर्यायांचा क्रमांकही सारखाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, संबंधित खासगी क्लास, संबंधित उमेदवार आणि त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी गांगर्डे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT