Ahilyanagar municipal corruption Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar municipal corruption : आयुक्त डांगेच्या प्रतिक्रियेला राजकीय वास? ठाकरेंच्या शिलेदारांनं टायमिंग साधत दिला इशारा

Shivsena Sanjay Raut Road Scam Allegation Kiran Kale Criticizes Commissioner Yashwant Dange Reply : अहिल्यानगर महापालिकेत सुमारे 776 रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळाच्या आरोपावर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar road scam controversy : अहिल्यानगर महापालिकेत सुमारे 776 रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळाच्या आरोपावर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी लोकप्रतिनिधींच्या अगोदर पुढे येत, अशा कोणताही घोटाळा झाला नसल्याची प्रतिक्रिया दिली.

यावर शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी जोरदार निशाणा साधताना, आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते? कायदेमंडळाच्या देशातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ सदस्यांना अशा प्रकारे राजकीय उत्तर देणाऱ्या आयुक्तांवर हक्कभंग का आणला जाऊ नये? असा सवाल केला.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे किरण काळे यांनी या कामांच्या घोटाळ्याची माहिती आणि तक्रार पूर्वी केली आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगरमधील या घोटाळ्याबद्दल पत्र लिहून पुराव्यांची फाईल पाठवत गुन्हे दाखल करत दोषींची तुरूंगात रवानगी करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली. यानंतर महापालिकेचे तथा प्रशासक आयुक्त डांगे यांनी तात्काळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, "अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत तक्रार नाही. 2020 ते 2023च्या कामाबाबत तक्रारत नाही. ही तक्रार वस्तुस्थितीला धरून नाही. अशी कोणतीही बोगस कामे महापालिकामार्फत झालेली नाहीत. काम न करता बिल देण्याचा प्रकार महापालिकेमार्फत झालेला नाही आणि होत नाही". एवढ्या मोठ्या रकमेचे कामे महापालिकेत झालेले नाही. अहिल्यानगरमधील नागरिक जागरूक आहे. काहीही चुकीचे झाले की, मोठ्याप्रमाणात तक्रारी लोक करतात. महापालिका प्रशासन देखील त्यावर लगेचच कार्यवाही करते, असाही दावा आयुक्त डांगे यांनी केला.

'महापालिका अधिनियम 1949 नुसार महापालिकेचा कारभार चालतो. लोकशाही प्रक्रियामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे काही मार्गदर्शन घेतले जाते. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप शहराचे लोकप्रतिनिधी आहे. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. काही समस्या सोडविण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे गैर नाही', असेही आयुक्त डांगे यांनी म्हटले.

आयुक्तांविरोधात हक्कभंगाची तयारी

आयुक्त यशवंत डांगे यांच्या या प्रतिक्रियेवर आणि या घोटाळ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "मला काहीही माहित नाही. कोणताही घोटाळा झालेला नाही, असं वक्तव्य आणि प्रसार माध्यमांना माहिती आयुक्त डांगे यांनी दिली आहे. मुळात शिवसेना नेते संजय राऊत देशाच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृहाचे खासदार आहेत. त्यांनी आमदार संग्राम जगतापांवर गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्या पत्रकार परिषदेत केले होते. आयुक्तांना नव्हे तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे. त्या आरोपांना मात्र उत्तर हे आयुक्त पदासारख्या घटनात्मक प्रशासकीय पदावर असणाऱ्या व्यक्तीने दिले आहे".

राऊत यांना पुन्हा भेटणार

'कायदेमंडळाच्या देशातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ सदस्यांना अशा प्रकारे राजकीय उत्तर देणाऱ्या आयुक्तांवर हक्कभंग का आणला जाऊ नये? त्यातही उत्तर देताना धादांत खोटी माहिती त्यांनी मनपाच्या आयुक्त पदावरून प्रसारित केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग आणण्याबाबत आम्ही कायदेशीर माहिती घेत आहोत', असे काळे यांनी म्हटले आहे. आयुक्तांनी दिलेल्या प्रतिक्रियाच्या वृत्त देखील प्रसारित झाले आहे. याची माहिती घेऊन, लवकरच खासदार राऊत यांना भेटणार आहोत, असेही काळे यांनी सांगितले. यामुळे डांगे यांच्या अडचणीत भविष्यात वाढण्याची चिन्हे आहेत.

आयुक्तांनी निवडणूक लढवावी

किरण काळे यांनी आयुक्त डांगे यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. "आयुक्त डांगे हे राजकीय कार्यकर्त्या प्रमाणे वागत आहेत. राजकारण करायची एवढीच हौस असेल, तर त्यांनी कार्यक्षम, भ्रष्ट नसणाऱ्या, प्रामाणिक अधिकाऱ्यासाठी महापालिकेच्या आयुक्त पदाची खुर्ची खाली करावी. खोके सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत पक्ष प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढवावी". मात्र नगरकरांना कुणाच्याही रिमोट कंट्रोलवर चालत वेठीस धरू नये, असा सल्ला देखील दिला.

डांबर खाल्ले

आरोप झालेल्या काळ पाहाता, शिवसेना, भाजपचाच महापौर होता, असे सांगताना, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आत्ताचे पदाधिकारी सत्तेच्या खुर्चीवर होते. वास्तविक पाहता त्यांना येथील जनतेने निवडून दिले ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हिंदू धर्मरक्षक (कै.) अनिलभैया राठोड यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे, हे आताचे माजी नगरसेवक विसरले आहे. या लोकांकडे कोणता विश्वास आहे? यांची प्रवृत्ती विटा, वाळू, गोळा करायची आहे. रस्त्यासाठी लागत असणारे डांबर देखील यांनी खाल्लं आहे, असा घणाघात काळे यांनी केला.

शिंदे यांच्या दारात जाऊन रडले

'आपल्या भ्रष्टाचाराच्या फायली उघडून गुन्हे दाखल होतील. या भीतीपोटीच शहराच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या दारात जाऊन रडले. आम्हाला वाचवा म्हणून टाहो फोडला. शहराचे आमदार हे महायुती सरकारचे सदस्य आहेत. त्यामुळे सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आता राजकीय संरक्षण मिळाले आहे. ते भाजप, महायुतीच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत आहेत. मात्र जनता यांना माफ करणार नाही', असेही किरण काळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT