Nagar Political : मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. अंबड गावात हा प्रकार घडला. महिला सरपंच रेश्मा कानवडे यांनी मोदी सरकारच्या रथाला रोखत फसव्या योजनांचे 'पोस्टमाॅर्टेम'च केले. स्थानिक पोलिस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर संकल्परथ पुन्हा गावात आणून चित्ररथाचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अंबड गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोदी सरकारचा विकसित भारत संकल्प यात्रा रथ येताच ग्रामस्थ आक्रमक झाले. सरपंच रेश्मा कानवडे, उपसरपंच नाथा भोर यांनी रथाची माहिती देणाऱ्या पदाधिकारी यांना शेतीप्रश्न आणि विविध मुद्यांवर विरोध केला.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे घसरलेले दर, कांदा निर्यातबंदी, अवकाळी पावसाची न मिळालेली नुकसानभरपाई, गॅस सिलिंडरचे वाढलेले भाव, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, शेतमजूर, कामगारांचे प्रश्न, प्रशासनातील लालफितीचा कारभार, ऑनलाइनच्या नावाखाली वेळकाढूपणा, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी मुद्यांवर हा मोदी सरकारचा संकल्परथ येताच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला.
यावेळी मोदी सरकारऐवजी 'भारत सरकार' असा उल्लेख करावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या स्वामिनाथन आयोगाच्या समितीने केलेल्या शिफारशी लागू करा. मग रथाचे कार्यक्रम गावात सादर करा, अशी मागणी सरपंच रेश्मा कानवडे यांनी केली. हा संकल्पथ नसून प्रचाराचा रथ आहे. या रथासोबत असलेल्या अधिकाऱ्यांवरदेखील सरपंच कानवडे यांनी रोष व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ग्रामस्थांना रोष पाहिल्यानंतर रथाबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क केला. पोलिस ठाण्याचे अधिकारी विजय करे यांनी ग्रामस्थांची सुरुवातीला समजूत काढली. सरपंच कानवडे आणि पोलिस अधिकारी करे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा कार्यक्रम सरकारचा आहे. तुम्ही विरोध करू नका. तुम्ही पाकिस्तानचे आहात काय ? तुम्हाला ऐकायचे नसेल, तर ऐकू नका, अशा शब्दांत विजय करे यांनी सुनावले.
भाजप (BJP) चे जिल्हा उपाध्यक्ष गिरिजाजी जाधव, माधव भोर, कैलास कानवडे, केशव मालुंजकर तिथे होते. स्थानिक ग्रामस्थांशी त्यांनीदेखील चर्चा केली. रथाला विरोध न करण्याची मागणी केली. सरपंच कानवडे आणि ग्रामस्थांची यानंतर भूमिका मवाळ झाली. यानंतर संकल्परथाचा कार्यक्रम एका मंदिरात झाला. यावेळी बोटावर मोजण्याइतपत भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामस्थांनी मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.