Nagar Urban Bank Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Urban Bank : दिलीप गांधी कुटुंबीयांभोवती 'अर्बन' गैरव्यवहाराप्रकरणी अडचणी वाढल्या

Bank Fraud : सनदी लेखापाल शंकर अंदानी याला कोठडी, तर दुसरे विजय मर्दाविरुद्ध 'लूक आऊट नोटीस'ची तयारी

Pradeep Pendhare

Nagar News : नगर अर्बन सहकारी बहुराज्यीय बँक गैरव्यवहारात बँकेचे तत्कालीन दिवंगत अध्यक्ष भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कुटुंबीयाभोवती कारवाईचा फास आवळला जाऊ लागला आहे. या आर्थिक व्यवहारात सनदी लेखापाल तथा बँकेचे माजी संचालक शंकर घनश्यामदास अंदानी याला न्यायालयाने मंगळवार ( 20 फेब्रुवारी) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर याच गुन्ह्याशी संबंध असलेले सनदी लेखापाल विजयकुमार मर्दा याला 'लूक आऊट नोटीस' काढण्याची तयारी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे. Nagar Urban Bank

शंकर घनश्यामदास अंदानी याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नगर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात अंदानी आणि बँकेचे तत्कालीन दिवंगत अध्यक्ष भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स व बँकेचे कर्जदार पटियाला हाऊस अशा दोघांशी झालेले आठ लाख रुपयांचे व्यवहार संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. तसा न्यायालयासमोर नगर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी युक्तिवाद केला आहे.

माजी संचालक आणि बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार नगर अर्बन गैरव्यवहारात गुन्हा दाखल झाला आहे. अर्बन बँकेच्या घोटाळ्यात (Nagar Urban Co-operative Bank Ltd) आतापर्यंत आठ जणांना अटक झाली आहे. यात माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह तिन माजी संचालकांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखाचे पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके हे तपास करत आहेत. संदीप मिटके यांनी पदभार स्वीकारत नगर अर्बन बँकेच्या फॉरेन्सिक ऑडिटचा अभ्यास केला. यानंतर ते कारवाईबाबत अॅक्शन मोडमध्ये आले. यात सनदी लेखापाल शंकर अंदानी याचा आर्थिक व्यवहारामागील गुन्ह्यात सक्रिय सहभाग आढळला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी, तत्कालीन अध्यक्ष दिलीप गांधी (मयत) आणि इतर आरोपी कुटुंबीयांसमवेत जवळचे संबंध आहेत.

गांधी कुटुंबीयांची विरा लीड लाईट्स व मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स या कंपन्यांचे लेखापरिक्षण शंकर अंदानी याने केले होते. मेमर्स मनसुख मिल्क कंपनीच्या बँक खात्यावरून त्यांच्या खात्यात दोन लाख रुपये वर्ग झाले आहेत. तसेच अंदानी याने गुन्ह्यातील थकीत कर्जदार पटियाला हाऊसच्या बँक खात्यामध्ये सहा लाख रुपये वर्ग केले आहेत. हा व्यवहार संशयास्पद असून, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना करायचा आहे. शंकर अंदानी याने हे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. हे व्यवहार अर्बन बँकेशी निगडीत नाहीत. तसेच संचालक मंडळाच्या चार बैठकींना उपस्थित होतो. यावेळी एकही कर्ज मंजूर झाला नसल्याचा दावा अंदानी याने केला. पोलिसांनी यावर शंकर अंदानी यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. Nagar Urban Bank

विजय मर्दाविरुद्ध 'लूक आऊट नोटीस'ची तयारी

सनदी लेखापाल विजय मर्दा याला शहर सहकारी बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक झाली होती. यात त्याची जामिनीवर सुटका झाली. विजय मर्दावर नगर अर्बन बँक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात सहभागी असताना त्याला वर्ग करून न घेता सोडून देण्यात आल्याचा आक्षेप बँक बचाव समिती आणि ठेवीदारांच्यावतीने न्यायालयात घेण्यात आला होता. याबाबत विजय मर्दा यांच्या शोधासाठी 'लूक आऊट नोटीस' काढण्यात येत असल्याचे तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी सांगतिले. तसेच या गैरव्यवहाराशी निगडीत असलेल्या 58 आरोपींच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यात येत असून, ती मिळताच पुढची कारवाई होईल, असेही तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. Bank Fraud

Edited By : Rashmi Mane

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT