Nagar Urban Bank Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Urban Bank Scam : नगर अर्बन बॅंक गैरव्यवहार प्रकरण; भाजपच्या दिवंगत माजी खासदारांच्या बंगल्यावर निघणार आसूड मोर्चा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील वैभवशाली नगर अर्बन बॅंकेचा परवाना रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला. गैरव्यवहारांमुळे ही बॅंक बुडल्याचा आरोप होत आहे. काही गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल झालेत. बॅंक ज्यांच्यामुळे बुडाली त्यांच्यावर कारवाईची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. परंतु, बॅंक बुडवणारे राजकीय पाठबळामुळे खुलेआम फिरत आहेत. याविरोधात बुधवारी (ता. 22) आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात बॅंकेतील गोरगरीब ठेवीदार, पेन्शनर, ज्येष्ठ नागरिक, महिला ठेवीदार सहभागी होणार आहेत. हा आसूड मोर्चा बुधवारी (ता. 22) सकाळी साडेदहा वाजता नगर अर्बन बॅंक येथून निघणार आहे. सुरुवातीला हा आसूड मोर्चा भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्या घरावर जाणार आहे. त्यानंतर तेथून हा मोर्चा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकेल, अशी माहिती बॅंक बचाव कृती समितीचे सदस्य धोंडोपंत कुलकर्णी यांनी दिली.

नगर अर्बन बॅंकेची धुरा भाजपचे (BJP) दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी वाहत होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेचा कारभार पाहिला गेला. सुवेंद्र गांधी यांची पत्नी दीप्ती गांधी या बॅंकेत उपाध्यक्ष होत्या. परंतु, 113 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक बुडाली.

रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेच्या अनियमित कारभारामुळे परवाना रद्द केला. ही बॅंक राजकारण्यांनी बुडवली असून, हे राजकारणी खुलेपणाने फिरत आहेत. आमदार, खासदारांबरोबर डाळ वाटप कार्यक्रम घेत फिरत असल्याचा आरोप बॅंक बचाव कृती समितीकडून होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मोर्चासंदर्भात निवेदन काढताना धोंडोपंत कुलकर्णी यांनी बॅंकेचा कारभार पाहणाऱ्याविरोधात चांगलीच आगपाखड केली आहे. सभासदांनी विश्वासाने बॅंकेची जबाबदारी ज्यांना दिली, त्यांनी बॅंकेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला. यात बॅंक बुडाली. बॅंक ओरबडून खाल्ल्याने अनेक गोरगरिबांची संसार उभी करणारी ही कामधेनू राजकारण्यांनी बंद पाडल्याचा घणाघात धोंडोपंत कुलकर्णी यांनी केला. (Nagar Urban Bank News )

बॅंक वाचवण्यासाठी अजूनही कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. बॅंक लुटणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या बॅंकेवर ठेवीदारांचा आजही विश्वास आहे. बॅंकेत आजही सुमारे 350 कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.

बॅंकेत शेकडो कर्मचारी काम करत आहेत. बॅंक बुडीत निघाल्याने कर्मचाऱ्यांचे संसारदेखील रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे बॅंक वाचवण्यासाठी या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन बॅंक बचाव कृती समितीचे सदस्य धोंडोपंत कुलकर्णी यांनी केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT