Sanjay Raut & Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Central Constituency: 'नाशिक मध्य'चे संकट; काँग्रेस- शिवसेना आणि भाजप तिन्ही पक्ष प्रचंड चिंतेत?

Congress vs Shivsena UBT : नाशिक मध्य मतदार संघावरून काँग्रेस पक्ष तुटेपर्यंत ताणेल का? याची सध्या चर्चा सुरू आहे.

Sampat Devgire

Nashik News: नाशिक मध्य मतदारसंघ शहरातील सर्वात चर्चेचा मतदार संघ आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला जातो याची प्रचंड उत्सुकता आहे. दुसरीकडे भाजप पक्षांतर्गत आव्हानाला सामोरा जात आहे.

जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा शेवटच्या टप्प्यात आहे. केव्हाही जागा वाटपाचे आणि उमेदवारांची घोषणा होऊ शकते. अशा स्थितीत नाशिक मध्य मतदारसंघ राज्यभर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे.

काँग्रेस पक्ष या मतदारसंघासाठी अडून बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तो प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे पक्षासाठी प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा, असा आग्रह धरला आहे.

खासदार राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार दाखवा आणि मतदारसंघ मिळवा, असे थेट आव्हानच दिले आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने माजी महापौर वसंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. उमेदवारी देण्याच्या यादीत आणि बैठकीत माजी महापौर गीते यांना निमंत्रित करण्यात आले होते.

माजी आमदार गिते यांना पक्षाने निवडणूक कशी लढवावी, प्रचार आणि स्ट्रॅटेजी याबाबत देखील खास सूचना दिल्या आहेत. शिवसेनेचे विशेष निरीक्षक या मतदारसंघात दोन टप्प्यात आढावा घेऊन यंत्रणेला दिशा देणार आहेत.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत देखील आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील हे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या या उमेदवारांना भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना आव्हान द्यायचे आहे.

भाजपकडे अनेक गुप्त आणि सुप्त यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. त्याला टक्कर देणारा उमेदवार काँग्रेसकडे नाही, असा शिवसेनेचा दावा आहे. काँग्रेस मात्र हा दावा अमान्य करत आहे. श्री पटोले आणि पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात दोघेही या मतदारसंघाबाबत आग्रही आहेत.

शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात या मतदारसंघावरून तुटेपर्यंत ताणले जाते की काय, अशी स्थिती आहे. हा मतदारसंघ न मिळाल्यास प्रसंगी स्वतंत्र निवडणुकांना सामोरे जाण्याचा विचार देखील होऊ शकतो, असे एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले.

भाजप आपली ही जागा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. मात्र आमदार फरांदे यांच्या उमेदवारीला पक्षातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. पक्षाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी आणि स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील दोघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

गेली दहा वर्षे या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असलेले आणि ज्यासाठी भाजप राजकारणात आहे, असे काहीही काम आणि परिवर्तन सध्याच्या आमदार करू शकल्या नाही असा या इच्छुकांचा आरोप आहे. आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय होऊ शकतो, असा इशारा पक्षाच्या एका इच्छुकाने दिल्याने खळबळ उडाली आहे.

त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही अडचणीचा विषय ठरला आहे. भाजपपुढे उमेदवारीचा व बंडखोरीचा आणि महाविकास आघाडीला जागा वाटपाचा तिढा सोडवायचा आहे. त्यात आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने काय होते याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT