MLA Suhas Kande
MLA Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

माझ्या मतदारसंघाचा निधी मी इतरत्र वळवू देणार नाही; भले त्यासाठी संघर्षही करेन

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : माझ्या नांदगाव मतदारसंघात निधी द्यावा, एवढीच माझी मागणी आहे. माझा वाद वैयक्तिक नसून तात्विक आहे. माझ्या मतदारसंघाचा हक्काचा निधी इतरत्र वळविला जात आहे, ते मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. माझ्या नांदगावकरांचा निधी मी इतरत्र वळवू देणार नाही. भविष्यात संघर्ष करण्याची गरज पडली, तर संघर्षही करेन, अशा इशारा शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे. ( Nandgaon constituency funds will not be diverted elsewhere : MLA Suhas Kande)

नांदगाव येथे दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) आपत्कालीन निधीवरुन सुरू असलेली धुसफूस आज (ता. २५ सप्टेंबर) पुन्हा चव्हाट्यावर आली. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कान टोचताच आक्रमक कांदे काही तासातच शांत झाले आणि भुजबळ-कांदे यांच्यात दुसऱ्यांदा पॅचअपचे प्रयत्न झाले.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे नांदगाव मतदार संघास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देताना दुजाभाव करत आहेत. या उलट भुजबळ आपल्या येवला मतदारसंघात जास्तीचा निधी आपल्याच जवळच्या लोकांना देत आहेत, असा थेट आरोप करत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा डीपीडीसीच्या निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली.

आमदार सुहास कांदे म्हणाले की, जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) अंतर्गत दिला जाणारा निधी हा समसमान वाटप न करता पालकमंत्री भुजबळ हे येवला मतदारसंघात व त्यांच्या मर्जीतील लोकांना त्यांच्या पदाचा गैरवापर करून निधी देतात. त्यांनी 80 कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा निधी हा येवला मतदार संघाकरिता घेतला आहे. माझ्या नांदगाव मतदारसंघाकरीता अत्यंत तुटपुंजा निधी दिला आहे. सरकारकडून परिपत्रक क्रमांक डीएपी 1013/प्र. क्र.277/का.1481 तारीख 28 जून 2013 च्या परिपत्रकानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते निधी मंजूर करावा, असे म्हटले आहे. तसेच, सर्वच तालुक्यांना समसमान निधी वाटप करावा. लोकप्रतिनिधींच्या पत्रांचा, सूचनांचा आदर करावा, असे निर्देश शासकीय निर्णयात स्पष्टपणे दिले आहेत.

मी आमदार असून जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे, त्यानुसार तसा माझा अधिकार आहे. मी फक्त माझ्या अधिकाराचा वापर करत असून त्यांना सांगतो आहे की, माझ्या मतदारसंघात निधी द्यावा. माझा वाद वैयक्तिक नसून तात्विक आहे. शासकीय निर्णयाप्रमाणे मला निधी द्यावा, हीच माझी मागणी आहे. माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा हक्काचा निधी इतरत्र वळविला जातो आहे, ते मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. माझ्या नांदगावकरांचा निधी मी इतरत्र वळवू देणार नाही. माझ्या नांदगाव मतदारसंघाच्या विकासाकरता मी कटिबद्ध आहे. भविष्यातही कटिबद्ध राहील आणि संघर्ष करण्याची गरज पडली तर संघर्षही करेन. पण, नांदगाव मतदारसंघाचा विकास करेन, असेही कांदे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT