मुंबईहून फोन येताच आक्रमक आमदार कांदेंचा भुजबळविरोध मावळला

वरकरणी हे पॅचअप वाटत असले तरी नांदगाव मतदार संघात परस्परविरोधात लढावे लागत असताना महाआघाडी सरकारमध्ये जुळवून घेताना होणारी घुसमट या यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
Chhagan Bhujbal-MLA Suhas Kande
Chhagan Bhujbal-MLA Suhas KandeSarkarnama

नाशिक : नांदगाव येथील दुसऱ्या पुरामुळे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) आपत्कालीन निधीवरुन सुरु असलेली धुसफूस दुसऱ्यांदा चव्हाट्यावर आली. मात्र, काही तासांतच आमदार कांदे यांचे शिवसेनेच्या वरिष्ठांकडून कान टोचले गेले आणि निधी वाटपाचा वाद हा पेल्यातील वादळ ठरून त्यांच्यात दुसऱ्यांदा पॅचअपचे प्रयत्न झाले. वरकरणी हे पॅचअप वाटत असले तरी नांदगाव मतदार संघात परस्परविरोधात लढावे लागत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये जुळवून घेताना होणारी घुसमट या यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. परस्परांच्या विरोधावर ज्यांचे राजकारण अवलंबून आहे, अशा आमदारांची होणारी घुसमट महाविकास आघाडीत यानिमित्ताने दिसू लागली आहे. (Dispute between Chhagan Bhujbal and MLA Suhas Kande over DPDC funds)

नांदगाव मतदार संघ हा पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे या दोघांसाठी राजकीय रणांगण आहे. भुजबळांचे पुत्र पंकज आणि आमदार कांदे हे मतदार संघातील परस्परांचे राजकिय प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे कुणा एकाचे राजकिय वर्चस्व वाढणे किंवा वाढू देणे दुसऱ्याला राजिकयदृष्ट्या गैरसोयीचे ठरते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या, तसतसा दोन्ही बाजूकडून राजकीय जागरुकता वाढत आहे. सध्या हा राजकीय वर्चस्वाचा संर्घष पुन्हा उफाळून आला आहे.

Chhagan Bhujbal-MLA Suhas Kande
आता तरी EDच्या चौकशीला परब हजर राहतील ; सोमय्यांचा टोला

नांदगावला पहिला पूर आला, त्यात अनेक पूरग्रस्त बेघर झाल्यावर पहिल्यांदा त्याला तोंड फुटले. सांगली, कोल्हापूरप्रमाणे निधीची मागणी करीत आमदार कांदे यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे आग्रह धरला. कोरोनामुळे सरकारने निधीवाटपाला जी कात्री लावली आहे, तो वित्त विभागाचा आदेश भुजबळांनी दाखवित मागण्या रोखून धरल्या. तेथून संर्घषाला सुरुवात झाली. नांदगावमधील या संघर्षाचे घुमारे नाशिकमध्ये फुटले. मात्र, त्यात जिल्हा नियोजन समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मध्यस्थी करीत पहिले पॅचअप घडविण्याचा प्रयत्न केला.

Chhagan Bhujbal-MLA Suhas Kande
मला त्रास देणाऱ्यांचे काय करायचे हे जनताच ठरवेल : भुजबळ

निधी वाटपाविषयी पाचशे तक्रारी

नांदगावला दुसऱ्यादा पूर आला, पुन्हा अनेक पूरग्रस्तांच्या अडचणी पुढे आल्या. पण, पूरग्रस्तांसाठी जिल्हा नियोजन समितीतून काहीच मदत मिळत नाही; म्हणून अस्वस्थ झालेले आमदार कांदे पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी भुजबळांच्या डीपीडीसीतील निधी वाटपावर संशय व्यक्त करीत थेट आरोप केला. यावर ते थांबले नाही तर जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपातील अन्यायविरोधात सरकारला प्रतिवादी करत थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा रोष सोशल मिडियावरुन जाहीर करीत त्यांनी पालकमंत्री भुजबळ यांना घेरण्याचा प्रयत्न केला. प्रश्न त्यांच्या नांदगाव मतदारसंघातील निधीपुरताच असला तरी, त्यांच्या भुजबळांवरील आरोपामुळे हा विषय महाविकास आघाडीत सुरु असलेल्या धुसफूस आमदारांची अस्वस्थता चव्हाट्यावर मांडणारा ठरला.

दुसऱ्यांदा पॅचअप

पहिले पॅचअप घडविणारे जिल्हाधिकारी रुग्णलयात ॲडमीट असल्याने आजच्या कोरोना आढावा बैठकीत त्याचे पडसाद उमटणार, असे चिन्ह दिसू लागले. स्वतः कांदे नांदगावहून त्याच आवेशात नाशिकला आले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्याच आवेशात आज मी बोलणार, न बोलता जाणार नाही, असे जाहीरही केले. मात्र, महाविकास आघाडीतील ही धुसफूस चव्हाट्यावर येण्याची कुणकुण त्यांच्या पक्षातील ज्येष्ठांना लागली. लागलीच घडामोडी फिरल्या. मुंबईतील एका ज्येष्ठ खासदारांसह पक्षात आणि सत्तेत वरचष्मा असलेल्या एका शिवसेनेच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्याने कांदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मात्र कांदेचा आवेश गळाला. भुजबळ यांच्यासोबत बैठकीत सहभागी झाल्यानंतर पत्रकारांना जाहीर केल्याप्रमाणे कुठलेही म्हणणे न मांडताच ते बैठकीतून थेट गायब झाले. यामागे मुंबईतून त्यांचे पक्षाकडून कान टोचले गेल्याची चर्चा आहे.

येवल्याप्रमाणेच नांदगावला निधी मिळावा, यासाठी आपण ठाम राहणार असल्याचे वक्तव्य करीत त्या डीपीडीसी निधी वाटपातील घोळाच्या कथित ५०० तक्रारींबाबत सोयीस्कर मौन बाळगत त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा भुजबळ यांच्यासोबत पॅचअप केले. भलेही हे तात्पुरते पॅचअप झाले असले तरी, यानिमित्ताने महाविकास आघाडीतील परस्परांच्या विरोधावर ज्यांचे राजकारण अवलंबून आहे, अशा आमदारांची होणारी घुसमट मात्र चव्हाट्यावर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com