उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करीत काँग्रेसने आपला गड पुन्हा राखला. नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबुतीने उभा राहिलेला पाहायला मिळत आहे.
लोकसभेच्या यशानंतर पक्षाने आता विधानसभेची रणनीती आखलेली आहे. लोकसभेच्या विजयानंतर आता काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये असलेले अनेक चेहरे उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. सध्या काँग्रेसमध्ये उमेदवारांसाठी इच्छुकांची रांग लागली आहे.
2014 नंतर नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था वाईट झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून आला. जिल्ह्यात आगामी विधानसभेसाठी काल काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या चार विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून 18 उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काँग्रेसमध्ये सध्या उमेदवारांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे.मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी एकूण सहा उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे शहादा तळोदा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे चित्र आहे. शहादा तळोदा मतदारसंघात भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी एकूण नऊ उमेदवारांनी काँग्रेसकडे इच्छा व्यक्त केली आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा आदिवासीसाठी राखीव असून एकूण चार विधासभा मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. सध्या या चार मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघावर भाजपचा आमदार आहे. तर उर्वरित दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. नंदुरबार विधानसभेत मंत्री विजयकुमार गावित हे भाजपचे आमदार आहेत.
शहादा तळोदा मतदारसंघात राजेश पाडवी हे देखील भाजपचे आमदार आहेत. नवापूर विधान सभा हा काँग्रेसच्या गड असून त्या ठिकाणी शिरीष कुमार नाईक हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर दुसरीकडे माजी आदिवासी विकास मंत्री असलेले के सी पाडवी हे अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून काँग्रेसचे आमदार आहेत.
आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित यांनीही शहादा-तळोदा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखत दिली. ते या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून नुकताच त्यांनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.