Nilesh Rane: नीलेश राणे शिवसेनेत जाणार! विधानसभा धनुष्यबाण चिन्हावर लढणार?

Nilesh Rane will join shiv sena kudal candidature: नीलेश राणे यांना शिवसेनाप्रमुखांविषयी आणि पक्षाविषयी विशेष ममत्व होते. पण, पक्षासाठी इतका संघर्ष केल्यानंतर वडिलांवर अन्याय होतो हे लक्षात आल्यानंतर ते वडिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी थेट शिवसेनेला शिंगावर घेण्यास सुरवात केली.
NILESH RANE.jpg
NILESH RANE.jpgSarkarnama
Published on
Updated on

माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे (narayan rane) यांची जी जडणघडण झाली ती शिवसेनेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षातील ज्येष्ठांना डावलून संधी दिली. तसे निर्णय घेताना शिवसेनाप्रमुखांनी कोणाला काय वाटते याचा विचार केला नाही. त्यांचा शिवसैनिक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा जो प्रवास झाला त्याचे श्रेय अर्थात बाळासाहेबांनाच जाते.

बेस्टचे अध्यक्षपद असेल किंवा मनोहर जोशींच्या जागी त्यांना मुख्यमंत्री करणे असेल. त्यांना जेव्हा मुख्यमंत्री केले तेव्हा पक्षात त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ असलेल्या मंडळीही होती. राणे हे शिवसेनेचे हे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ मंडळी मंत्री म्हणून काम करीत होते.

राणेंनी बाळासाहेबांचा विश्वास जिंकला होता. त्यांची काम करण्याची पद्धत त्यांना भावली होती. निर्णय घेण्याची क्षमता अर्थात राणे यांच्याकडे होती. राज्यात कधी नव्हे ती सत्ता आली असताना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. सत्तेचा काहीच उपयोग होत नाही. सरकारविषयी नाराजी होती. हे सरकार पुन्हा येणार नाही असे लोकच बोलू लागले होते. विरोधीपक्षात मोठ्या ताकदीचे नेते होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विलासराव देशमुख, मधूकर पिचड, छगन भुजबळ, आरआरआबा पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे नेते सरकारवर तुटून पडत होते. माध्यमातूनही सरकारवर टीकेचे प्रहार सुरू होते. पत्रकारांवर हल्ले होत होते. सरकारची प्रतिमा मलिन करण्यात विरोधक यशस्वी झाले होते, अशा वेळी नारायण राणे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले पण, खूप उशीर झाला होता.

हीच संधी वर्षे दोन वर्षे अगोदर मिळाली असती तर पुन्हा युतीचे सरकार आले असते. मात्र बंदुकीतून गोळी सुटून गेली होती. डागाळलेली सरकारची प्रतिमा लगेच सुधारणार नव्हती. काही महिनेच मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांना लोकांचा विश्र्वास संपादन करता आला नाही. १९९९ ला युती सरकार जनतेने खाली खेचले.

NILESH RANE.jpg
Mahayuti: बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीची खेळी; निवडणुकीपूर्वीच 'त्या' 12 आमदारांची नियुक्ती होणार

राणे विरूद्ध शिवसेना संघर्ष

पुढे सहावर्षे म्हणजे २००६ पर्यंत पक्षात सक्रिय राहिले. उद्धव ठाकरे यांच्याशी न पटल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला. राणे कॉंग्रेसमध्ये गेले. आमदार म्हणून दणदणीत मतांनी निवडूनही आले. मंत्री बनले. त्यांना वाटत होते की काँग्रेसवाले एक दिवस आपल्याला मुख्यमंत्री करतील. मात्र ही कॉंग्रेस आहे. येथे ते शक्य होणार नाही हे त्यांना कळले असावे.

कॉंग्रेसमध्ये असतानाच त्यांचे पूत्र नीलेश राणे हे कोकणातून खासदार म्हणून निवडून आले. पण, पुढे दोनदा त्यांचा शिवसेनेने पराभव केला. राणे यांचाही कुडाळमध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्येही पोटनिवडणुकीत पराभव झाला. गेल्या अठरा वर्षापासून शिवसेना विरूद्ध राणे हा राजकीय संघर्ष सुरू आहे. तो आजही थांबला नाही. २०२४ मध्ये नारायण राणे यांनी उटे काढत कोकणात विनायक राऊत यांना अस्मान दाखविले.

शिवसेनेला शिंगावर घेण्यास सुरवात

राणे यांचे ज्येष्ठ पूत्र नीलेश राणे यांच्या राजकारणाला सुरवातच शिवसेनेत झाली होती. त्यांना शिवसेनाप्रमुखांविषयी आणि पक्षाविषयी विशेष ममत्व होते. पण, पक्षासाठी इतका संघर्ष केल्यानंतर वडिलांवर अन्याय होतो हे लक्षात आल्यानंतर ते वडिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी थेट शिवसेनेला शिंगावर घेण्यास सुरवात केली. एका मुलाखतीत नीलेश यांनी सांगितले होते की नीतेश पेक्षा मी शिवसेना जवळून पाहिली आहे.

माझे पक्षावर आणि साहेबांवर प्रेम होते. शिवसेनेपासून राणे कधी दूर जातील असे वाटत नव्हते. मात्र ते घडले. राणे कुटुंबात आज नारायण राणे खासदार, नीतेश आमदार आहेत. आगामी निवडणुकीत नीलेश राणे यांना शिवसेनेचे वैभव नाईक यांच्याविरोधात कुडाळमधून निवडणूक लढवायची आहे. ते शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर लढणार असल्याचे समजते.

NILESH RANE.jpg
Manoj Jarange Patil: शरद पवार यांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका; जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

कुडाळचं का?

कुडाळ का निवडले तर त्याला पार्श्वभूमी आहे.काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीधर नाईक यांची. त्यांची हत्या झाली होती. याचे थेट धागेदोरे राणे यांच्याशी जोडले गेले असल्याचे बोलले जात होते. तेव्हा राणे शिवसेनेत होते. मात्र याबाबत खुद्द राणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे त्या खूनाशी माझा काही संबंध नाही. पुढे राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर श्रीधर नाईक यांचे पूत्र वैभव नाईक शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी निवडणूक लढविली आणि राणे यांचा (२०१४)पराभवही केला.

नाईक यांना कसेही करून घरी बसवायचे...

राणेंविरोधात शिवसेना वैभव नाईक यांना नेहमीच बळ देत आली आहे. वैभव हे राणेंना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राणेंना नाईक यांना कसेही करून घरी बसवायचे आहे. त्यासाठीच नीलेश राणे यांना मैदानात उतरायचे असावे. कोकण हा शिवसेनेचा प्रारंभीपासूनच बालेकिल्ला राहिला आहे. आता तर शिवसेनेचे दोन पक्ष बनले आहेत.

नीलेश राणे यांना पुन्हा धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेनेचा आमदार होण्याची इच्छा असावी. नाईक यांचा पराभव करायचा तर शिवसेनाच हवी असे त्यांना वाटत असावे. पहिले प्रेम शिवसेना होते. त्यांना एकदा तरी शिवसेनेचा आमदार व्हावे असे वाटत असावे. पाहू या निवडणुका तोंडावर आहेत. कोण कोणत्या पक्षात असेल कोणता झेंडा कोणाच्या खांद्यावर असेल ते. नीलेश राणे शिवसेनेत प्रवेश करतील का आमदार होतील का ? याची मात्र प्रतीक्षा करावी लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com