Chandrakant Raghuwanshi with Eknath Shinde
Chandrakant Raghuwanshi with Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये शिवसेनेला डबल धक्का; चंद्रकांत रघुवंशी एकनाथ शिंदे गटात

Sampat Devgire

नंदुरबार : गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेनेतील बंडखोरीमुळे संभ्रमावस्थेत असलेले नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. कालच त्यांनी बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला होता. आज त्यांनी सहकाऱ्यांसह मुंबईत शिंदे यांची भेट घेतली. (Nandurbar Shivsena organisation get shocked by rebel group)

जिल्ह्यातील त्यांचे राजकीय समर्थक, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी आदी कार्यकर्त्यांसह रविवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे.

गेल्या महिन्यापासून शिवसेनेत पडलेली फूट व त्यावरून पेटलेले राजकारणामुळे राज्यातच नव्हे, तर देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे निष्ठावान व बंडखोर असे उघड उघड दोन गट शिवसेनेत पडले. वर्षापूर्वी काँग्रेस सोडून शिवबंधन बांधत उद्धव ठाकरेंवर विश्‍वास दाखवून धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आतापर्यंत मात्र स्थिर होते.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर स्थापन झालेले भाजप-शिवसेना शासन आणि त्यानंतरच्या गटबाजीचे राजकारणाला अधिकच जोर चढला. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेचे लक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भूमिकेकडे लागले होते. बंडखोर आमदारांमध्ये साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर श्री. रघुवंशी यांच्या भूमिकेकडेही साशंकतेने पाहिले जात होते. अखेर आज त्यांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करीत शिवसेनेला मोठा हादरा दिला.

आमदार सौ. गावित यांना श्री. रघुवंशी यांचा पाठिंबा आहे. तसेच श्री. रघुवंशी यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या होत्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भेटून शुभेच्छा देणारा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळेसही त्यांचा भूमिकेबाबत तर्कवितर्क लावले गेले. तेव्हापासून त्यांच्याविषयी चर्चा अधिकच रंगू लागल्या. मात्र त्यानंतर मागील पंधरवड्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेशानुसार निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यावेळी श्री. रघुवंशी यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतचा व्हायरल फोटोवरही चर्चा झाली होती.

त्यावेळी मात्र श्री. रघुवंशी यांनी निष्ठावंत शिवसैनिक आहोत, दोन गट शेवटी शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे बंडखोरी असली तरी मुख्यमंत्री शिवसेनेचे झाले व ते पक्षाचे असल्याने त्यांचे अभिनंदन करणे मी माझे कर्तव्य समजलो, त्याचा अर्थ वेगळा काढू नये, असे म्हटले होते.

वादावर पडदा पडेल

श्री. रघुवंशी यांचे एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याच्या चर्चेला काहीसा विराम मिळाला होता. मात्र, मागील आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या. आगामी पालिका निवडणूक व जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सत्ता व त्यामुळे विकासकामांसाठी शेवटी शासनाकडेच जावे लागणार आहे. त्या वेळी गटातटाचे राजकारण आडवे येऊ नये, त्यापेक्षा सत्तेत असलेल्या गटासोबतच जावे, असा आग्रह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सुरू झाला. त्यामुळे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन्हीही गट अखेर शिवसेनेचेच आहेत. एक दिवस वादावर पडदा पडेलच. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय अखेर घेतला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT