Maharashtra Politics : नाशिकमध्ये काल (दि. 16) शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाने एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. त्यातून शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलमध्ये भाजपसह महायुतीवर टीका करण्यात आली. मात्र त्यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.
खासदार नारायण राणे यांनी (दि. 17) मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. राणे म्हणाले, आता बाळासाहेब ठाकरे नाहीत. इतक्या वर्षात उद्धव ठाकरेंनी कधी बाळासाहेबांचे विचार आचरणात आणले नाहीत. बाळासाहेबांच्या भाषणाच्या घरी कॅसेट असतील त्या त्यांनी रात्रभर ऐकाव्यात व त्यातून बोध घ्यावा असा सल्ला राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
राणे पुढे म्हणाले, लोकांपर्यंत जाणं, शिवसैनिकांना सांभाळणं, प्रेम देणं हे सगळं बाळासाहेबांनी केलं म्हणून शिवसेना मजबूत झाली. मी ३९ वर्ष शिवसेनेत होतो, उद्धव ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही. अडीच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री राहून त्यांनी राज्याचे नुकसान केलं आहे. त्यांच्यामुळे राज्य दहा वर्ष मागे गेल्याचे राणे म्हणाले.
पवारसाहेबांची मेहरबानी होती म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पुढच्या वेळेला विधानसभेत त्यांचे पाच आमदारही नसतील, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कधी भिकाऱ्यांना भीक पण दिली नाही. शिवसेना एकनाथ शिंदे यांची सुरु आहे आणि उद्धव ठाकरेंची बंद अवस्थेत आहेत. असं राणे म्हणाले.
दरम्यान नारायण राणेंनी बेस्ट उपक्रमाला भेट दिली. बेस्टची सध्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे राणे म्हणाले. बेस्टच्या पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक असून, बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे. संस्थेला मोठ्या मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ १५०० बस असून, प्रत्यक्षात ८००० बसची आवश्यकता आहे, असेही नारायण राणेंनी नमूद केलं.
जीएम स्तरावर हे प्रश्न सुटण्यासारखे नसून आता मी स्वतः राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे. येत्या दहा दिवसात मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि बीएमसी आयुक्तांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने मदत केल्यास बेस्ट मुंबईत टिकून राहील, असे मत नारायण राणेंनी व्यक्त केले. बेस्ट कामगारांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असही राणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.