Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळांनी दिवाळीत आळवली पारंपारीक गिते!

विधानसभचे प्रभावी सभापती नरहरी झिरवाळ यांनी आपली दिवाळी वनारे (दिंडोरी) येथे पारंपारीक पद्धतीने साजरी केली.

Sampat Devgire

नाशिक : विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Maharashtra assembly Vice president Narhari Zirwal) यांची वाटचाल आदिवासी भोवाडा, लोककला सादर करीत झाली आहे. त्यांचे राहणीमान आजही अत्यंत साधे व त्यांचे घर तर त्याहूनही आहे. त्यांनी आपली दिवाळी मुलांसोबत आदिवासी गिते गाऊन आनंदाचा प्रकाश पसरवत साजरी केली.

श्री. झिरवाळ हे अत्यंत साधं राहणीमान, स्वभावात कमालीची नम्रता व हाती घेतलेल्या कामाचा प्रचंड ध्यास असं सामान्यातलं असामान्य नेतृत्व असलेले ना. झिरवाळ यांनी यशाच्या शिखरावर असतानादेखील जमीनीशी नाळ कधी तुटू दिली नाही. सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष असतानाही ते फावल्या वेळेत शेतात नांगर हाती धरतात. प्रत्येक आठवड्याचा रविवार म्हणजे त्यांच्या घरी सकाळपासून जनता दरबार भरलेला असतो. या दरबाराच्या माध्यमातुन मतदार संघातील लोकांच्या लहान-मोठ्या समस्यांचे सहज निराकरण होते. यंदाची दिवाळी देखील त्यांनी तशीच परिसारतील लोकांच्या भेटीगाठींत साजरी झाली.

ते वडिलांच्या सोबत लहान असतानापासून गावोगावी जाऊन भोवाडा, लोककला, किर्तन करीत आले आहेत. ती कला त्यांनी अद्यापही जोपासली आहे. आजही ते केव्हाही ग्रामीण, आदिवासी गितांत हरवून जातात. काल दिवाळीला त्यांनी परिसरातील मुले जमल्यावर असाच ठेका धरला. लहान मुलांनी त्यांना साथ दिली.

पारंपारीक आदिवासी गिते, परंपरा जोपासत झाली

मला पंचाळा शेवटत नाय ना, मला पंचाळा शेवटत नाय ना.

का रे, पंचाळा शेवटत नाय ना, का रे, पंचाळा शेवटत नाय ना.

माझी धामन चालत नाय ना, माझी धामन चालत नाय ना.

का हो धामन चालत नाय ना, का हो धामन चालत नाय ना.

मला कोळसा बी मिळत नाय ना, मला कोळसा बी मिळत नाय ना.

जळन, जळन सारी रात, जळन, जळन सारी रात...

या पारंपारीक गितांत दिवाळीचा आनंद त्यांनी मनसोक्त लुटला.

सर्वसमावेशक प्रगल्भ विचार सरणी आणि सर्वांना सोबत घेऊन प्रगती करण्याचा ध्यास असला की मनुष्य अनंत अडचणींवर मात करून स्वत:बरोबरच संपूर्ण समाजाचाही विकास करू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होत. ग्राम पंचायत सदस्यपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

दिंडोरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्‍यात वनारे या अतिदुर्गम गावात जन्मलेल्या नामदार नरहरी झिरवाळ यांचा जीवनप्रवास आजच्या तरूण पिढीला निश्‍चितच प्रेरणा देणारा आहे. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र असूनही शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेतून त्यांनी गावातील प्राथमिक शिक्षणानंतर वणी येथे राहून उच्च शिक्षण घेतले. मात्र, पोटापाण्याची चिंता अन्‌ मार्गातील अनंत अडथळे यामुळे काही दिवस रोजगार हमी योजनेत रोजंदारीवर काम केले. नाशिकला बांधकाम ठेकेदाराकडे बिगारी म्हणूनही काम केले तर घरी पत्नी व त्यांनी विहीर खोदत शेती ही फुलवली.

शिक्षण आणि स्वकतृत्त्वाच्या जोरावर तहासिल कार्यालयात नोकरीही केली. या काळात त्यांना प्रामुख्याने आदिवासी व शेतकरी बांधवांच्या समस्या जवळून बघावयास मिळाल्या. त्यातच, जनता दलाचे तत्कालीन खासदार हरिभाऊ महाले यांच्या जनसेवेचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. त्यातून त्यांनी समाजाच्या हितासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा धडपड्या आणि मनमिळाऊ स्वभाव पाहून ग्रामस्थांनी त्यांना राजकारणात पहिलेच पाऊल घट्टपणे रोवण्याची संधी दिली.

त्याद्वारे मिळालेले ग्रामपंचायत सदस्यत्व, सरपंचपद आणि येथून सुरू झालेला त्यांचा सोसायटी पंचायत समिती ,जिप असा राजकीय प्रवास थेट विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत येऊन पोहचला आहे. या प्रवासात मागे वळून पाहण्याचा प्रश्‍नच नव्हता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून आज नरहरी झिरवाळ यांच्याकडे बघितले जाते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT