Maharashtra News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) एका कारवाईने राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयामध्ये गुरुवारी रात्री एसीबीच्या पथकाने अचानक छापा टाकला. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून कार्यालय सील केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. लातूर मधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. हा परवाना पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ढेरंगे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील ३५ हजार रुपये सुरुवातीच्या टप्प्यात देण्याचे ठरले होते. हे पैसे ढेरंगे स्वीकारत असताना त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ढेरंगे याच्यासोबत मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील आणखी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. झिरवाळ यांचे खासगी सचिव (पीएस)रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरुन आपण लाच मागितली असा जवाब ढेरंगे यांनी दिल्याचे समजते.
या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडण्याचे कारण म्हणजे चक्क मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातच हे लाच नाट्य घडलं आहे. एसीबीच्या सहा अधिकाऱ्यांनी झिरवाळ यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. आता तपास पूर्ण होईपर्यंत हे कार्यालयच सील करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच लाच स्वीकारणारे ढेरंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
दरम्यान या प्रकरणानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माझ्या मंत्रालयातील कार्यालयात छाप्याच्या घडलेल्या प्रकाराची मला काही कल्पना नाही असे सांगितले आहे. आपण सध्या दिल्ली दौऱ्यावर असून माझ्यासोबत माझे खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी आहेत अशी माहिती झिरवाळ यांनी दिली. तसेच या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाही. आपला या प्रकरणाशी सुतराम संबंध नाही. तसेच मंत्री, पीए यांच्याशी त्याचा संबंध नाही असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
तसेच याप्रकरणाची चौकशी व्हावी, जर खरंच या प्रकरणाशी माझा संबंध सापडला तर मी राजीनामा देईन असं मंत्री झिरवाळ यांनी म्हटलं आहे. माझं कार्यालय सील केल्याची माहिती मला तुमच्याकडून मिळत असल्याचं झिरवाळ माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले. पंरतु मला असं वाटत नाही की माझं कार्यालय सील केलं असावं. तरीही मी आज दिल्लीहुन मुंबईला जाणार आहे तेव्हा बघतो. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी खूप बारकाईने मंत्रालयातील स्टाफ भरला आहे. ढेरंगे हे आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात. त्यांची कधीही तक्रार आली नव्हती पण त्यांनी काल काय प्रकार केला त्याबाबत सांगता येणार नाही. मुळात तो सरकारी कर्मचारी आहे आणि त्याच्यासाठी ५० हजार रुपये फार आहेत असं नाही. पण त्याने अशा गोष्टी करायला नकोत. आपण त्यांना पाठिशी घालणार नाही. पण मी खात्रीने सांगतो या प्रकरणाची चौकशी व्हावी माझा संबंध कुठे आला तर मी राजीनामा देईल असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.
दरम्यान या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा तिसरा मंत्री अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अधिवेशनाच्या तोंडावरच मंत्री झिरवाळ यांच्या दालनातील अधिकारी लाच घेताना सापडला आहे. याची जबाबदारीही झिरवाळ यांनी स्वीकारली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.