Nashik Sarpanch Meet : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने येत्या ११ ऑक्टोबर रोजी नाशिक येथेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल सुमारे १० हजार सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी नाशिक येथील मोदी ग्राउंडची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’चा बक्षीस वितरण समारंभ तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० (२०२६-२७)’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे, याचसोबत ‘भूगर्भ जलाचे संवर्धन उपलब्ध जलसाठ्याचा परिणामकारक वापर व दुष्काळ परिस्थिती हाताळण्याबाबत विविध कौशल्य विकसित करणे’ या विषयावर सरपंच परिसंवाद होणार आहे.
या संवाद मेळाव्यात राज्यातील गावांच्या विकासासोबतच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचे नियोजन, पाणी साठवणूक, भूजल पातळी वाढविणे, जलसंधारण तसेच ‘वॉटर बजेट’ यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. पाऊस पडल्यानंतर गावात किती पाणी उपलब्ध होते, त्यापैकी किती पाणी साठवले जाते आणि किती पाणी वाहून जाते, याचा ग्रामपातळीवर विचार करून भविष्यातील पाणी नियोजन कसे करता येईल, यावरही संवाद साधला जाणार आहे.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ तात्कालिक उपाययोजनांऐवजी गावागावांत पाण्याची उपलब्धता, साठवणूक आणि भविष्यातील गरज यांचे नियोजन करण्यावर या संवाद मेळाव्यात भर दिला जाणार आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांना गावाच्या विकास आराखड्यासोबतच पाण्याच्या प्रश्नावर स्थानिक पातळीवर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी चारा पुरवठा, भूगर्भातील पाणीसाठा वाढविणे, जलसंधारणाच्या उपाययोजना, पाण्याबाबत जनजागृती आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गावपातळीवरील नियोजन या विषयांवरही चर्चा होणार आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा मेळावा अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचा थेट सहभाग घेऊन पाणी व्यवस्थापन आणि गावांच्या विकासासाठी भविष्यातील उपाययोजनांवर विचारमंथन केले जाणार आहे.
या मेळाव्यासाठी सुमारे १० हजार सरपंच, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीच्या दृष्टीने मोदी ग्राउंडवरील जागेची पाहणी मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. पाहणीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारी व्यवस्था, पार्किंगची सुविधा, उपस्थितांची ये-जा, कार्यक्रमस्थळावरील आवश्यक सोयी-सुविधा आणि इतर नियोजनाचा मा. मंत्री जयकुमार गोरे यांनी आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत सर्व व्यवस्था योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
ग्रामविकासासोबतच पाण्याचे शाश्वत नियोजन, जलसंधारण आणि गावपातळीवरील विकासाचे नियोजन या विषयांना या संवाद मेळाव्यात विशेष महत्त्व राहणार असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुढील टप्प्याला यामुळे दिशा मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.