Nashik Bribe news : नाशिक जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नसून आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. अंगणवाडी मदतनीस पदी निवड करून नियुक्तिपत्र दिल्याच्या मोबदल्यात २० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या सुरगाणा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील पर्यवेक्षिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. १९) रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे सुरगाणा तालुक्यात खळबळ उडाली आहे. हेमलता धवळू गाढवे (वय ५३) असे संशयित लाचखोर पर्यवेक्षिकेचे नाव आहे.
तक्रारदार महिलेची गुणवत्तेच्या आधारावर ३० सप्टेंबर रोजी सुरगाणा तालुक्यातील शिराटा येथील अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून नियुक्ती झाली होती. त्याबाबतचा आदेश मिळाल्यानंतर त्या कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. हे केंद्र माणी बिटअंतर्गत येत असल्याने संबंधित बिटच्या पर्यवेक्षिका गाढवे यांनी, ‘तुमची मदतनीस म्हणून निवड करून नियुक्तीचे आदेश मिळवून दिले आहेत,’ असे सांगत वरिष्ठांच्या नावाने तसेच स्वतःसाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने यासंदर्भात १२ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता, संबंधित पर्यवेक्षिकेने लाचेची मागणी केल्याचे आणि तडजोडीनंतर दहा हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी (दि. १९) सुरगाणा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार महिलेकडून पंच साक्षीदारांसमक्ष दहा हजारांची रक्कम स्वीकारताना ‘ACB’च्या पथकाने गाढवे यांना पकडले. याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, संशयित लाचखोर आरोपीला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, अंमलदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे, योगेश शिंदे आणि परशराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.