

Nashik Nominated Corporators : नाशिक महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या दहा जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरु आहे. नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्याने भाजपच्या वाट्याला दहापैकी सर्वाधिक ६ जागा येणार आहेत. मात्र, इच्छुकांची संख्यादेखील भाजपकडे सर्वात जास्त आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपकडे सुमारे तीनशे ते चारशे जण बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे उमदवार निश्चित करण्याचे मोठे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाले आहे.
दरम्यान असे असताना सोमवारी (दि. १९) भाजपमधील १५ उमेदवारांच्या नावांची यादी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली. त्या यादीतूनच सहा नावे फायनल होणार असल्याची चर्चा सुरु झाली. या व्हायरल यादीमुळे भाजपांतर्गत संघर्षाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. ज्या इच्छुकांची नावे या यादीत आली नाहीत त्यांचा संताप झाला. त्यांनी थेट पक्षाचे शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना अक्षरशः जाब विचारत धारेवर धरले.
अखेर शहराध्यक्ष केदार यांना व्हायरल यादीत तथ्य नसल्याचे जाहीर करावे लागले. महापालिका निवडणुकीवेळी भाजपकडे इच्छुकांची संख्या हजारात होती. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकपदासाठी देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. तथापि, मुख्यमंत्री, भाजप प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री, प्रदेश कोअर कमिटी जो निर्णय घेईल तोच अंतिम राहिल, असा खुलासा केदार यांना करावा लागला.
नियुक्ती प्रक्रियाच पुढे ढकलली
केवळ भाजपमध्येच नाही तर उबाठा व कॉंग्रेसच्या गटातही वाद सुरु आहे. असे असताना आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या लांबणीवर टाकण्यात आली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते, मात्र आता थेट ४ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे नगरसचिव विभागाने स्पष्ट केले. ३१ ऑक्टोबर कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होत आहे. सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाची यंत्रणा व्यस्त असल्याचे कारण देत ही नियुक्ती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
कॉंग्रेसकडून स्थगितीची मागणी
तर, स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया महापालिकेने गुपचूप राबवण्यास सुरुवात केल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक सुफियान जिन यांनी केला आहे. ही प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी त्यांनी आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे केली आहे. त्यामुळे याविषयाला आता वेगळ वळण मिळालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.