Shirdi FIR Controversy: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातविरोधात याचा पहिला गुन्हा अहिल्यानगरच्या शिर्डी इथं दाखल झाला. यानंतर नाशिक इथं शोषणाच्या वेगवेगळ्या तक्रारी येत, या प्रकरणाचा स्फोट झाला. अशोक खरात याचे सर्वाधिक व्यवहार हे शिर्डीतून चालत होते. तसे समता पतसंस्थेच्या शिर्डी शाखेतील व्यवहार SITच्या तपासात समोर येत आहे.
परंतु शिर्डी इथं दाखल गुन्ह्याचं क्रेडिट भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेत आहेत. यावरूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सिन्नर तालुक्यात मंत्री विखे पाटील यांच्या बहिणीचे चिरंजीव तहसीलदार असताना, आता ते मंत्री विखे पाटलांचे ओसीडी आहेत, त्यावेळचा बंदूक परवानाचा प्रस्तावाचा मुद्दा उकरून काढत, आरसा दाखवला आहे. सुषमा अंधारे यांच्या या मुद्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना (ShivsenaUBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीड इथं पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना SITच्या संथगतीच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. तसंच मंत्री विखे पाटील यांनी शिर्डीत अशोक खरातप्रकरणात दाखल केलेल्या 'FIR'च्या क्रेडिटवरून देखील सुषमा अंधारे यांनी सुनावलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, "मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe), मी कसा हुशार आहे, हे सांगायचा नेहमीच प्रयत्न करत आहेत. ते राजकारणामध्ये खूप आधीपासून आहेत, जेष्ठ आहेत, अहिल्यानगरमध्ये शिर्डीमध्ये माझ्यामुळे 'FIR' दाखल झाला असे म्हणायचे असेल तर, पण याच वेळेस नाही, गेली दोन दशक अहिल्यानगरची सत्ता आणि मक्ता हे विखे पाटलांच्याच हातात आहे, मग विखे पाटलांनी याकडे आता कसं काय दुर्लक्ष केलं? विखे पाटलांना जर असं म्हणायचं असेल, तर 'FIR' माझ्यामुळे झाली, तर 'FIR'चं क्रेडिट घ्यायचा असेल, तर दुसऱ्या गोष्टीचंही क्रेडिट तुम्हाला घ्यावे लागेल."
'अशोक खरातसाठी बंदूक नूतनीकरणाचा जो प्रस्ताव आला, तो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तहसीलदारांकडे आला, ज्यांनी तो प्रस्ताव पुढे पाठवला. सिन्नरचे त्यावेळचे तहसीलदार हे कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती, राहुल खोताडे हे विखे पाटलांच्या सख्ख्या बहिणींचे चिरंजीव आहेत, हेच राहुल खोताडे हे मंत्री विखे पाटलांचे आताचे ओएसडी म्हणून काम करत आहे, यावर विखे पाटलांचा काय म्हणणे आहे?', असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला.
'मंत्री विखे पाटलांनी शिर्डीतील 'FIR' बरोबरच, राहुल खोताडेंनी खरातच्या बंदूक परवान्याचा प्रस्ताव कोणत्या लोकप्रतिनिधीच्या शिफारशींनी निर्गमित केला, याचे उत्तरे देखील दिलं पाहिजे. राहुल खोतडेंकडे याची विचारणा केलीत का? कारण की ते आता तुमचे 'ओएसडी' आहेत', असे अंधारे यांनी म्हटलं.
'अशोक खरात प्रकरणात 'SIT'ची स्थापन होऊन, एक महिना होऊन गेलेला आहे. 'SIT'कडून तपास विशिष्ट पद्धतीने होईल, अशी अपेक्षा असताना देखील तो होताना दिसत नाही. 'SIT'ने अनेक लोकांना चौकशीला बोलावलेलं नाही. प्रशासकीय अधिकारी भांडेकर याला पदमुक्त केलं पाहिजे आणि चौकशीसाठी बोलावलं पाहिजे, ते अजूनही होताना दिसत नाही. दीपक लोंढे अन् दीपक केसरकर हा सहसंबंध आहे, अजूनही तो संबंध रेकॉर्डवर येत नाही', याकडे सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलं.
'परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीविरोधात बुलडोजरची कारवाई झाली, ती योग्यच होती. पण त्याच तत्परतेनेच कारवाई अशोक खरात प्रकरणात, त्याच्या नाशिकमधील फार्म हाऊसवर कारवाई होताना दिसत नाही. याशिवाय त्याच्याबरोबर कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या, समता पतसंस्थेमध्ये ज्यांची खाती अशोक खरात वारसदार म्हणून आहेत, त्या चाकणकर यांच्या संपत्तीवर बुलडोजर आणि सर्व चौकशी कधी होणार आहे? यामुळे SIT'च्या कार्याबद्दल, इच्छा नसतानाही शंका व्यक्त करावी लागत आहे,' असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.