Nashik Politics : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लाखो मराठी मनांमध्ये अढळ स्थान मिळवणारे नेतृत्व होते. त्यांच्या ज्वलंत विचारांचे आजही अनेकजण अनुकरण करतात. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नाशिकमधील गंगापूर रोडवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात थ्रीडी होलोग्राम साकारले जात आहे. या माध्यमातून लोकांना बाळासाहेबांना जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना, त्यांच्या विचारांना अनुभवता येणार आहे. एवढच काय तर, त्यांच्याशी गप्पागोष्टी, संवाद आणि थ्रीडी चित्रासोबत फोटोही काढता येणार आहेत. हा प्रकल्प आणखी समृद्ध करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना २८ सप्टेंबर २०२४ रोजी या स्मृती उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. शिंदेंनी दिलेला शब्द पाळला असून, शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १० कोटींचा निधी दिल्याची माहिती उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये प्रथमच एखाद्या दिवंगत नेत्यांचे होलोग्रामद्वारे विचार पोहोचवले जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून मुंबईत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात अटलजींचा होलोग्राम तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा होलोग्राम तयार करण्यात येणार आहे.
शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून गंगापूर रोडवरील महापालिकेच्या जुन्या पंपिंग स्टेशनच्या जागेत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व शस्त्र संग्रहालयाची उभारणी केली आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्यांच्या मनात चिरंतन राहावे, हा या प्रकल्प उभारणीमागील उद्देश आहे. आता थ्रीडी होलोग्राम माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचार नाशिककर तसेच पर्यटकांना अनुभवता येणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली.
यापूर्वी हा प्रकल्प मनसेकडे होतो. त्यावेळी या ठिकाणी शस्र संग्रालय तयार करण्यात आलं होतं. मात्र मनसेची सत्ता गेल्यानंतर या स्मारकाची दुरावस्था झाली. त्यानंतर शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी साडेसात एकर क्षेत्रात विविध साहसी खेळांचा समावेश असलेले सर्वात मोठे अॅडव्हेंचर पार्क उभारण्यात आले आहे. लावंतांसाठी आर्ट गॅलरी, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ असलेले ५०० आसन क्षमतेचे भव्य अॅम्फीथिएटर, ५०० लोक क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह तसेच जगभरातील पुस्तकांचा समावेश असलेली ई-लायब्ररी उभारण्यात आली आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र तसेच सेमिनारसाठी अॅकॉस्टिक हॉलही उभारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.