Nashik News : नाशिकमध्ये गुन्हेगारी फोफावली असून सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट कायद्यालाच आव्हान देत शनिवारी मध्यरात्री एका हॉटेलमध्ये (बार) गोळीबाराची घटना घडली. यात हॉटेलमधील ग्राहक वरुन विजय तिवारी या तरुणाच्या मांडीत गोळी घुसली असून, त्याच्यावर मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे याच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे संशयित शुभम पाटील, दुर्गेश वाघमारे व आकाश अडांगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून संशयित भूषण लोढेंसह प्रिंस फरारी आहे. यापूर्वी दुहेरी खूनाच्या गुन्ह्यात भूषण लोंढेला तुरुंगवास भोगावा लागलेला आहे. त्याने कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा दहशत माजविण्यास सुरुवात केली.
बारचालकाकडून १० टक्के प्रोटेक्शन मनी वसूल करण्यासाठी दहशत निर्माण करायची या उद्देशाने आयटीआय सिग्नल परिसरातील औरा बार ॲन्ड रेस्टॉरंट येथे शनिवारी (ता. ४) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी भूषण लोढेंच्या बाउंसरकडून हत्यारांच्या वापरासह गोळीबार केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रोटेक्शन मनी वसुल करण्यासाठी भूषण लोढें याच्या टोळीतील काहीजण हॉटेलात वाद घालायचे. वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करुन भूषण हाच हॉटेलचालकाकडून कमिशनच्या रुपात १० टक्के प्रोटेक्शन मनी घेत होता. नाईस संकुलातील औरा बार ॲन्ड रेस्टॉरंटचे मालक मोहित नारंग आहेत. त्यांच्याकडून बिपिन पटेल व संजय शर्मा यांनी या वर्षी १ एप्रिलपासून भागीदारी करारावर बार चालवायला घेतला. बिपिन पटेल व संजय शर्मा यांनी दोन महिन्यांपासून भूषण लोंढेला दहा टक्के खंडणी रक्कम देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गोळीबारात जखमी व उपचार घेत असलेला वरुण विजय तिवारी (वय २३) याने दिलेल्या जबाबात संदिग्धता वाटल्याने पोलिसांनी घडलेल्या संपूर्ण घटनेची, घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी, तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. (Nashik News)
गोळीबारप्रकरणी कुख्यात गुंड भूषण लोंढेसह त्याचे साथीदार शुभम पाटील ऊर्फ भुरा, प्रिंस बिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश ऊर्फ अभिजित गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगे व इतर चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. संशयित आरोपींवर मोक्का कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे संशयितांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.