BJP Internal Conflict Nashik: नाशिकचे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अचानक राजीनामा दिला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी केदार यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.
नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले आहे. त्यानंतरही केदार यांनी परस्परच शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर मंत्री महाजन यांनी संताप व्यक्त करत नाशिकमध्ये भाजपला कुबड्यांची गरज नाही असे म्हटले होते.
नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर तर शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे गेले. त्यात भाजपने १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. तर शिवसेनेला २६, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या.
यानंतरही राज्यातील महायुतीप्रमाणे नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपने तयारी दर्शवली होती. त्यासंदर्भातील सुनिल केदार यांनी भाजप कार्यालयामार्फत प्रदेश कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. तोच प्रस्ताव त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिला होता.
पण हा प्रस्ताव गिरीश महाजन यांना पसंत पडला नाही. त्यांनी नाशिक महापालिकेत भाजपला 'कुबड्यांची गरज नाही' असे स्पष्टपणे सांगत शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग देण्यास नकार दर्शवला.
ज्या महापालिकांमध्ये आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढलो तिथे घटक पक्षांना सत्तेत सहभागी करुन घेतले. हे सांगताना त्यांनी जळगावचे उदाहरण दिले. म्हणाले, जळगावला आम्ही युती म्हणून लढतो, तिथे त्यांचे कमी नगरसेवक असतानादेखील सत्तेत सहभागी करून घेत आहोत.
परंतु नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असून, नंतर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने ७२ जागांवर नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे भाजपला नाशिकमध्ये कुबड्यांची गरज नाही.
शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नाही किंवा आम्ही कुणालाही प्रस्ताव दिलेला नाही असं सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी सुनिल केदार यांच्या दाव्याची हवाच काढून घेतली. महापौर, स्थायी समितीसह अन्य विविध महत्त्वाच्या पदांवर भाजपचाच दावा राहणार असल्याचे गिरीश महाजन यांनी ठणकावून सांगितले.
महाजन यांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही सुनील केदार यांना लांब ठेवले. या दोन्ही निवडींबाबत महाजन यांनी केदार यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती आहे. या सगळ्या नाराजीतूनच केदार यांनी महापौर आणि उपमहापौरपदाचे अर्ज दाखल होताच शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. केदार यांच्या राजीनाम्यानंतर महाजन यांच्या एककल्ली कारभाराची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.