Nashik Mayor : नाशिकच्या महापौर पदावर हिमगौरी आहेर- आडकेच का? इतर चर्चेतील नावे का मागे पडली?

Himgauri Aher Adke : नाशिक महापौर पदासाठी भाजपने हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: त्यांच्या नावाची घोषणा केली. ६ फेब्रुवारीला निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
Himgauri Aher Adke, Nashik Mayor
Himgauri Aher Adke, Nashik MayorSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापौर पदासाठी पालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने हिमगौरी आहेर-आडके यांचे तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही या नावांवर शिक्कामोर्तब केला आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असणाऱ्या गिरीश महाजन यांनी मंगळवार (दि. ३) वरील दोन्ही नावांची घोषणा केली. महापौर व उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेतील सर्व भाजप नगरसेवकांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यानंतर महाजन यांनी महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव जाहीर केले.

भाजपकडून महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचा तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महापौरपदाच्या रेसमध्ये आणखीही बरीच नावे होती ती सगळी मागे पडली. त्याचे कारण म्हणजे भाजपने आपल्या पडत्या काळापासून ते सत्ताकाळापर्यंत आजवर पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या आहेर कुटुंबावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

Himgauri Aher Adke, Nashik Mayor
Nashik Mayor Politics: नाशिक महापालिकेत आता भाजपचीच सत्ता! गिरीश महाजनांकडून नावांची घोषणा; 25 वर्षांनी महापौर पदासाठी 'मराठा' कार्ड!

महापौर पदाच्या शर्यतीत हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह दीपाली गिते, स्वाती भामरे, डॉ.दीपाली कुलकर्णी, चंद्रकला धुमाळ, सुप्रिया खोडे यांच्यासह एकुण दहा नावे इच्छुकांच्या यादीत होती. त्यातील चार नावे मंत्री गिरीश महाजन यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवली होती. पक्षश्रेष्ठींकडून महापौरपदी हिमगौरी बाळासाहेब आडके आणि उपमहापौरपदी मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची निवड निश्चित करण्यात आल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली.

हिमगौरी आहेर-आडके या भाजपचे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांच्या चुलत बहिण आहेत. राहुल आहेर यांचे वडील डॉ. डी एस आहेर हे भाजपचे अगदी निष्ठावान होते. नाशिक विधानसभा मतदारसंघातून आमदार व खासदार अशी दोन्ही पदे त्यांनी भूषवली होती. आरोग्यमंत्री देखील ते झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा पक्षाचा फारसा प्रभाव नव्हता तेव्हापासून आहेर कुटुंब हे भाजपसोबत आहे. डॉ. डी एस आहेर यांचे चिरंजीव राहुल आहेर हेही भाजपचे निष्ठावान असून चांदवड मधून तिसऱ्यांदा ते आमदार झाले आहेत. राहुल आहेर यांनीही हिमगौरी आहेर यांच्यासाठी आपले राजकीय वजन वापरल्याचे सांगितले जाते.

भाजपने नाशिकमध्ये सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने पक्षात अनेक आयारामांना प्रवेश दिले. त्यांना उमेदवारीही दिली. त्यावरुन भाजपवर टीकाही झाली. मात्र हिमगौरी आहेर-आडके यांचे महापौरपदासाठी नाव जाहीर करुन भाजपने निष्ठावंतांना न्याय दिल्याचे दाखवून दिले आहे. आहेर कुटुंबाचा प्रभाव पाहाता महापौरपदाच्या शर्यतीतील सगळी नावे आपोआपच मागे पडली. शिवाय हिमगौरी आहेर-आडके उच्चशिक्षित आहेत, निष्ठावान आहेत. हिमगौरी आहेर-आडके यांच्या मातोश्री शोभा आहेर याही उपमहापौर राहिल्या आहेत. तसेच वडील बाळासाहेब आहेर भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती राहिले आहेत.

Himgauri Aher Adke, Nashik Mayor
Mukesh Shahane Nashik : भाजपचेच होते पण अपक्ष लढले, बडगुजरांच्या मुलाचा पराभव केला ; ते मुकेश शहाणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटात

डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभेला हॅट्रिक केली. प्रचारादरम्यान त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला होता. तो अद्याप फडणवीस पूर्ण करु शकले नाही. मात्र आता त्यांच्या बहिणीला शहरात भाजपने महापौरपदावर संधी दिली आहे. तर उपमहापौरपदावर बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना संधी देत भाजपने पंचवटीतील राजकारणाचा समतोल राखला आहे.

महापौर पदाच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर दीपाली गिते यांचे नाव होते. मात्र त्या पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांच्याकडे अनुभव कमी होता. शिवाय त्यांचे पती गणेश गिते यांनी विधानसभेला बंडखोरी केली होती. त्यामुळे अंतर्गत विरोधकांनी त्यांची तिथे कोंडी केली. त्यानंतर दीपाली कुलकर्णी, संध्या कुलकर्णी यांचीही नावे घेतली जात होती. मात्र याआधी भाजपच्याच सत्ता काळात सतीश कुलकर्णी यांना महापौर केलं गेलं होतं. त्यामुळे अनुभव, पक्षनिष्ठा या सगळ्या गोष्टी पाहाता हिमगौरी आहेर-आडके यांच्या निमित्ताने यावेळी मराठा समाजाला संधी दिली गेली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com